(दापोली)
दापोली–मंडणगड मार्गालगत खोंडा परिसरातील मुस्लिम वस्तीत उभा असलेला गंजलेला विद्युत खांब मोठ्या अपघाताला आमंत्रण देत असल्याचे चित्र समोर आले आहे. वस्तीच्या मध्यभागी असलेला हा खांब पूर्णपणे गंजून कमकुवत झाल्याने तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, या खांबाच्या दुरवस्थेबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीची कल्पना देण्यात आली; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. वस्तीतील लहान मुले या परिसरात खेळत असतात, तसेच दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत गंजलेला खांब कोसळल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वीजपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून हा खांब बदलावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

