(देवरुख)
शहरातील खालची आळी येथील श्री हनुमान प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्या श्री सत्यनारायण पूजे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक कलाकारांचा ‘आंधळा मागतो डोळा’ या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. मंडळाच्या 60 व्या पूजे निमित्ताने हा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला होता. मंडळ गेली 59 वर्षे पूजे निमित्ताने नाट्यप्रयोग साकारत आहे. ही परंपरा मंडळांनी जपत यंदा 60 व्या वर्षीचा नाट्यप्रयोग सादर केला.
पुजादिनी सकाळी महापुरुष व श्री हनुमान या देवतांचे पूजन करण्यात आले. यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा, महाआरती व महाप्रसाद यानंतर सायंकाळी तीर्थ प्रसाद व स्थानिक भजन कार्यक्रम करण्यात आला. दिवसभर आरोग्य तपासणी देखील स्वस्तिक रांबाडे यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. रात्री विद्याधर शिवणकर लिखित व संदीप पवार दिग्दर्शित ‘आंधळा मागतो डोळा’ हा विनोदी नाट्य प्रयोग सादर करण्यात आला.
या प्रयोगामध्ये दिग्दर्शक संदीप पवार यांच्यासह गुरुप्रसाद सावंत, सागर मुळये, सार्थक नलावडे, स्वरूप नलावडे, प्रज्वल राऊत, रवींद्र सावंत, अक्षय झेपले, सुयशा मुळये, वैभवी पवार यांनी मुख्य भूमिका साकारल्या यात निधी पवार, माही वनकर, स्वरा नलावडे, वीर वनकर, शेखर नलावडे यांनी देखील पाहुण्या कलाकार म्हणून भूमिका साकारल्या.
नाट्यप्रयोगात रसिकांनी शिट्या व टाळ्यांच्या गजरात दाद दिली. नाट्यप्रयोगाच्या पूर्वसंध्येला स्थानिक बाल गोपाळ कलाकार व महिला वृंद यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. यालाही रसिकांनी दाद दिली. कार्यक्रमामध्ये मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत साळसकर यांनी लिहिलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष रितेश संसारे महिला मंडळ अध्यक्षा सौ. वनकर, ज्येष्ठ सदस्या पदमा विभुते, मकरंद नलावडे, विलास वनकर, दत्ता शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मंडळ सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. नवनिर्वाचित नगरसेवक अक्षय झपले, कलाक्षेत्रातील झेप घेत असलेला विद्यार्थी शिवम नलावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
फोटो– आंधळा मागतो डोळा या नाट्यप्रयोगातील एक क्षण.

