(पुणे / वृत्तसंस्था)
पुणे जिल्ह्यातील देहू येथील भंडारा डोंगरावर साधारण दीड वर्षांची चिमुकली एकटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चिमुकलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील काळजीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील बालरोग विभागात दाखल केले आहे. तिच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.
डॉक्टर आणि लेखक प्रकाश कोयाडे यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या आवाहनानुसार, चिमुकलीला काल रात्री सुमारे ९ वाजून १५ मिनिटांनी वायसीएम रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असून आवश्यक वैद्यकीय तपासण्याही करण्यात आल्या आहेत. त्यांच्या अहवालानुसार चिमुकलीची प्रकृती चांगली असून ती अॅक्टिव्ह आणि खेळत आहे. तिच्या अंगावर कोणतीही जखम किंवा ओरखडा नसल्याचे सांगण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पुढील औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत.
चिमुकलीचे वय अवघे दीड वर्ष असल्याने तिला स्वतःचे नाव, घराचा पत्ता किंवा आई-वडिलांचे नाव सांगता येत नाही. तिला मराठी समजत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, हिंदीमध्ये “मम्मी” म्हटल्यावर ती हसते, असे नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयात ती खेळताना दिसत असली तरी तिची नजर सतत आई-वडिलांचा शोध घेत असल्याचे चित्र आहे.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी राणी राऊत या चिमुकलीची आईप्रमाणे काळजी घेत आहेत. तिला जेवू घालण्यापासून झोपवण्यापर्यंत तसेच डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन जाण्यापर्यंतची जबाबदारी त्या सांभाळत आहेत.
दरम्यान, चिमुकली भंडारा डोंगरावर कशी पोहोचली आणि तिला तेथे कोण घेऊन आले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील निगराणी कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यात आले आहे. मात्र, तिच्याबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. ती हरवली की तिला तेथे कोणी सोडले, तसेच तिचे आई-वडील आणि नातेवाईक सध्या कुठे आहेत, याचा तपास सुरू आहे.
ज्या वयात आईच्या कुशीत असायला हवं, त्या वयात ही चिमुकली रुग्णालयाच्या बेडवर एका अनोळखी पोलीस कर्मचाऱ्याच्या मायेवर विसंबून आहे, हे दृश्य मन हेलावून टाकणारं आहे. दरम्यान, पोलिसांकडून या चिमुकलीच्या आई-बाबांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या चिमुकलीच्या आई-वडिलांबाबत किंवा नातेवाईकांबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


