(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील धनजीनाका परिसरात कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पळून जाऊन झालेल्या विवाहाच्या वादातून दिराने आपल्या वहिनीवर लाकडी लाटण्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी अंजार बशीर हकीम (वय ३०, रा. धनजीनाका) हे एकाच कुटुंबातील आहेत. फिर्यादीची बहीण आणि आरोपीचा भाऊ आरफात बशीर हकीम यांनी कुटुंबाचा विरोध झुगारून पळून जाऊन विवाह केला होता. या विवाहाला आरोपीचा पाठिंबा होता, तर फिर्यादी महिलेचा विरोध असल्याने घरातील वातावरण काही दिवसांपासून तणावपूर्ण होते.
गुरुवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास या कारणावरून दोघांत शाब्दिक चकमक झाली. “तुम्ही माझ्या आयुष्याची वाट लावली, तशीच माझ्या बहिणीचीही लावणार आहात का?” असा सवाल फिर्यादीने केल्याने आरोपी संतप्त झाला. रागाच्या भरात त्याने स्वयंपाकघरातील लाकडी लाटणे आणून फिर्यादीच्या उजव्या हातावर व डाव्या कानावर प्रहार केले. त्यानंतर उजव्या कानावर जोरात फटका मारल्याने तिच्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाला, असे तक्रारीत नमूद आहे.
इतक्यावरच न थांबता आरोपीने पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व पुन्हा आरफातच्या विवाहाला विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर जखमी महिलेने शनिवारी (१४ फेब्रुवारी) रात्री उशिरा पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची ही आणखी एक घटना ठरली असून, समाजात संतापाची भावना व्यक्त होत आहे.

