(नवी मुंबई / भरत माने)
रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी मुंबईतील नेरूळ येथे महाशिवरात्रीनिमित्त इच्छापूर्ती दत्त दिगंबर मंदिरात विविध धार्मिक उपक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले. सकाळी विधिवत शिवअभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संध्याकाळी नित्य हरिपाठ झाला. त्यानंतर दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात भगवान दत्तांचे मनोहारी रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी सर्व भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली. आरतीनंतर उपस्थितांना फलाहार वाटप करण्यात आले.
यानंतर ॐ श्री श्री १००८ महामंडलेश्वर दिगंबर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवलीलामृत पारायण पार पडले. या कार्यक्रमात २०० हून अधिक भाविक सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. रात्री निशिथकाल शिवपूजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दिगंबर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक हिंदू सण मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमालाही नामभक्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

