(चिपळूण)
नगर परिषद निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याच्या ठपका ठेवत भारतीय जनता पार्टीने चार पदाधिकाऱ्यांविरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी दिलेल्या आदेशानुसार दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी, तर दोघांचे निलंबन करण्यात आले असून या निर्णयामुळे चिपळूणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणे, तसेच थेट उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवणे, अशा प्रकारच्या गंभीर पक्षविरोधी कारवायांचे ठोस पुरावे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयानुसार माजी नगराध्यक्षा व माजी जिल्हाध्यक्षा महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी सुरेखा नितीन खेराडे आणि सुधीर सुधाकर पानकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, श्रीराम शंकर शिंदे (माजी शहराध्यक्ष, चिपळूण शहर मंडळ) आणि परिमल सुरेश भोसले (जिल्हा उपाध्यक्ष, रत्नागिरी दक्षिण) यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पक्षशिस्तीचा भंग कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि भविष्यात अशा कारवायांवरही कठोर भूमिका घेतली जाईल, असा स्पष्ट इशाराही भाजप नेतृत्वाने दिला आहे. या कारवाईमुळे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चा आणि हालचालींना वेग आला आहे.

