(पाली / वार्ताहर)
विना सहकार नाही उद्धार हे ब्रीद घेऊन सुरू झालेल्या तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पाली या संस्थेची सातत्याने आर्थिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू असून त्याचीच दखल घेऊन या वर्षीचा बँको पतसंस्था सहकार परिषदे मार्फत सन २०२४ चा बँको ब्ल्यूरिबन राज्यस्तरीय पुरस्कार सलग तिसऱ्यांदा तक्षशिला पतसंस्थेला नुकताच प्रदान करण्यात आला. पुरस्कार माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, यांच्या हस्ते तसेच बँकोचे अविनाश शिंत्रे, गॅलेक्सी इन्माचे संचालक अशोक नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्षशिला संस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे, उपाध्यक्ष अमोल सावंत,सचिव प्रविण गुरव, व्यवस्थापक विनायक शिर्के, आनंद नेवरेकर, मंगेश मोरे यांना देण्यात आला.
तक्षशिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था,पाली या संस्थेची आर्थिक प्रगतीच्या दिशेने सातत्याने घोडदौड सुरू असून यंदा संस्थेने आपले रौप्य महोत्सवी साजरे केले आहे. नितीन कांबळे यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतल्यानंतर संस्थेला खऱ्या अर्थाने बळ आणि उर्जितावस्था मिळत आहे.अर्थात पूर्वीच्या सर्वच ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यमान संचालक, कर्मचारी यांच्या सहकार्यातून सभासदांचा विश्वास संपादन करण्यात संस्थेला चांगले यश मिळत आहे.
या पतसंस्थेने २४ वर्षात तब्बल १० हजार सभासदांचा टप्पा ओलांडला आहे. आता १६ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यावरूनच या पतसंस्थेची प्रगतीच्या दिशेने चाललेली घोडदौड अधोरेखित होते. सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरीकरिता राज्यस्तरावर दिल्या जाणाऱ्या “दीपस्तंभ” व “बँको ब्लू रिबन” या दोन पुरस्कारांनी तक्षशिलाला गौरवण्यात आले आहे.
संस्थेचे वाढते सभासद, भागभांडवल, ठेवी, गुंतवणूक, कर्जे, खेळते भांडवल यामध्ये झालेली भरघोस वाढ, सहकार खात्याचे सी. डी. रेशो, सी आर आर.,एस एल आर. चे आदर्श प्रमाण संस्थेने वेळोवेळी राखलेले आहे. सातत्याने ऑडीट वर्ग “अ” हा कायम ठेवला आहे. संस्थेने चालू वर्षामध्ये प्रधान कार्यालय व्यतिरिक्त संस्थेच्या दोन नवीन शाखांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी खेडशी येथील शाखा नुकतीच कार्यान्वीत झाली आहे. संस्थेने अत्याधुनिक सोयीसुविधा ग्राहकांच्या सेवेत दिल्या आहेत. ग्राहकांसाठी विविध योजनाबचत ठेव योजना, ग्रामीण भागात ग्राहकांसाठी विविध सुविधा एटीएम,अधिकृत वीज भरणा, एनईएफटी, आरटीजीएस, आय एम पी एस,एस एम एस बँकिंग,क्यू आर कोड सुविधा उपलब्ध आहे.
स्पर्धेच्या युगात सहकार क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असतानाच केवळ शिस्त, सभासदांबरोबरच समाजाप्रती असलेली उत्तर दायित्वाची भावना या जोरावरच “तक्षशिला” ने हा मोठा टप्पा पार केला आहे. त्यामुळेच पतसंस्थेच्या कार्याची दखल अगदी राज्य पातळीपर्यंत घेतली गेली आहे.
फोटो – बँको ब्लू रिबन राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारताना तक्षशिला पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे, उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव प्रविण गुरव व कर्मचारी