( विशेष /प्रतिनिधी )
जिल्ह्यातील 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा ही शासनाच्या आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची आणि जनतेच्या जीवाशी थेट संबंधित असलेली यंत्रणा आहे. मात्र या यंत्रणेच्या कारभाराबाबत जिल्हा रुग्णालयातील जन माहिती अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एका अधिकृत पत्रकातून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणातून धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या पत्रकातील माहिती वाचून जिल्हा शल्य चिकित्सक आणि 108 यंत्रणेचे व्यवस्थापक यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिलेल्या पत्रकानुसार 108 रुग्णवाहिकांमधील डॉक्टरांची नियुक्ती, त्यांचे अनुभव, सेवा अटी, वेतन पद्धती, तसेच मागील तीन वर्षांतील निवडीतील दस्तऐवज याबाबत पूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्याऐवजी सगळा कारभार खासगी कंपनी भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड (BVG-108) कडे सोपवण्यात आला आहे आणि त्यांच्याकडे पाठवण्याची शिफारस केली गेली आहे. परंतु खासगी कंपनीकडे जबाबदारी देण्यात आली असली तरी पण उत्तरदायित्व कुणाचे? हा थेट सवाल उपस्थित होत आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या 108 रुग्णवाहिकांमधील डॉक्टरांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर आणि बेफिकीर बाब आहे. जर डॉक्टरांची नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अनुभव, सेवाशर्ती या बाबींची माहिती प्रशासनाकडे नसेल, तर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जबाबदारी निश्चित कशी करणार? या महत्वाच्या प्रश्नासह शासनाच्या निधीतून पगार घेणारे डॉक्टर कोण?, नेमके कोणते डॉक्टर 108 मध्ये कार्यरत आहेत? त्यांची पात्रता काय आहे? प्रशासनाला याची माहितीच नसेल तर जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होत आहेत.
पाच वर्षांतील वेतनाची माहितीही प्रशासनाकडे नाही!
डॉक्टरांना मिळणाऱ्या वेतनाचे तपशील, मागील पाच वर्षांतील आर्थिक पारदर्शकता, कुठल्या पद्धतीने वेतन दिले गेले या सर्व बाबींबाबतही “BVG” कडे संपर्क साधा असे सांगितले गेले आहे. शासनाच्या निधीतून चालणाऱ्या सेवेसाठी अशा प्रकारची माहिती लोकप्रतिनिधी, जनतेकडून मागण्यात आली तर प्रशासनाकडे काहीच उत्तर नाही हे चिंताजनक आहे. हे सर्व म्हणजे हातचे सोडून बाहेरच्याच्या हाती कारभार देण्याचा प्रकार असल्याचे चित्र आहे. 108 सारख्या अत्यावश्यक यंत्रणेतील सर्व नाड्या खासगी कंपनीच्या हाती देऊन जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. आणि जर एखादी चूक, अपयश वा अपघात घडला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा देखील महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.