(रत्नागिरी/प्रतिनिधी)
“दैवी शक्तीच्या जोरावर पैशांचा पाऊस पाडून श्रीमंत करून देतो,” असे आमिष दाखवत महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला बारामती न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. मिलिंद मदन जाधव (वय ५०, रा. गुहागर, जि. रत्नागिरी) असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत ४ वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तर फसवणुकीप्रकरणी (IPC) २ वर्षांची शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
मूळचा गुहागर येथील असलेल्या जाधव याने बारामती परिसरात अघोरी पूजांचा बनाव रचत महिलांना जाळ्यात ओढले. “माझ्याकडे दैवी शक्ती आहे,” असा दावा करत त्याने पैशांचा वर्षाव घडवून आणण्याचे आमिष दाखवले. या बनावट पूजेच्या नावाखाली त्याने महिलांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळलेच, शिवाय त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचेही तपासात उघड झाले. या छळाला कंटाळून पीडित महिलांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले. सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी सात साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे आरोपीविरुद्धची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आरोपी दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
दरम्यान, आरोपी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याने गुहागर व चिपळूण परिसरातही त्याने अशाच प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या निकालामुळे अंधश्रद्धेच्या आडून सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांना चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, बारामती परिसरात या निर्णयाचे स्वागत होत आहे.

