(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई नालसा मॉडेल अंतर्गत शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम याबाबत सर्व नागरिकांना माहिती होण्यासाठी, लाभ वितरीत करण्यासाठी महामेळावा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे 15 मार्च रोजी शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात येत आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांनी या महामेळाव्याच्या नियोजनाबाबत आज जिल्हा न्यायालयातील सभागृहात बैठक घेतली. बैठकीला जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एम.अंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव राजेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.पाटील यांनी महामेळाव्याची रुपरेषा सांगितली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जाधव म्हणाले, पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा येथे 15 मार्च रोजी हा महामेळावा होणार आहे.
शासनाच्या जिल्ह्यातील सर्व विभागांच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना या महामेळाव्याच्या माध्यमातून एकत्रितपणे देता येणार आहे. प्रत्येक विभागाच्या शासकीय योजना, त्यांची माहिती, प्रचार प्रसिध्दी विशेषत: ऑनलाईन सायबर फसवणूक, ग्राहक फसवणूक यापासून स्वत:ची सुरक्षा याबाबत हा महामेळावा जनजागृती करेल. त्याशिवाय लाभार्थ्यांना या महामेळाव्यात प्रत्यक्ष लाभाचे वितरण देखील करण्यात येणार आहे. सर्व विभागांनी आपल्या विविध योजनांच्या माहितीसह, लाभार्थ्यासह यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

