(चिपळूण)
आजकाल साहित्य संमेलनांमध्ये भव्य मंडप, स्टेज आणि सजावटीवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र या पारंपरिक चौकटींना छेद देत निसर्गाच्या कुशीत, काजूच्या बागेत आणि माती-दगडांच्या बांधावर भरवण्यात आलेले ‘बांधावरचे साहित्य संमेलन’ हे मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव आणि अनुकरणीय प्रयोग ठरला. माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास हे ब्रीदवाक्य घेऊन रविवारी (ता. ८ फेब्रुवारी) चिपळूण नजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयुराची’ शिवारात हे संमेलन उत्साहात पार पडले. राज्यभरातून सुमारे ३५० साहित्यिक व रसिक या अनोख्या साहित्यिक अनुभवासाठी उपस्थित होते आणि निसर्गाशी थेट संवाद साधत साहित्य अनुभवण्याचा हा सोहळा सर्वांच्याच मनात घर करून गेला.
कोकणात भातशेतीसाठी पाण्याचा साठा करणाऱ्या माती किंवा दगडांच्या छोट्या भिंतीला ‘बांध’ म्हटले जाते. शेतीचे संरक्षण, मृदसंधारण आणि पावसाचे पाणी अडवून शेतीस उपयुक्त ठरणाऱ्या या बांधावर साहित्य संमेलन भरवण्याचा विचारच अनेकांसाठी नवा होता. कोकणच्या डोंगराळ भागात शेतीचा आधारस्तंभ ठरणाऱ्या या बांधावर साहित्यिक आणि रसिक एकत्र आले आणि माणूस, माती व निसर्ग यांचे नाते प्रत्यक्ष अनुभवले. या अभिनव उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांनी निसर्ग आणि साहित्य यांचे अतूट नाते स्पष्ट करताना आपण सर्व निसर्गाचाच एक भाग असल्याचे सांगितले. कवी आणि लेखकांना निसर्गापासून वेगळे करता येत नाही. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा त्याचे सामाजिक व सांस्कृतिक अस्तित्व अधिक महत्त्वाचे असून जीवनाचा शोध साहित्याच्या माध्यमातून घेता येतो. साहित्य माणसाला रिझवते, शिकवते, माहिती देते, वेदना मांडते आणि मानवी जीवनातील कंगोरे उलगडते, म्हणूनच ते आपल्याला आपलेसे वाटते, असे त्यांनी नमूद केले. उद्घाटक डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी बदलत्या काळातील भाषा, तरुणाई आणि संस्कृतीवर भाष्य करताना आजची भाषा संमिश्र असली तरी ती जिवंत असून तिचे स्वागत करायला हवे, असे मत व्यक्त केले. चिपळूणच्या मातीमध्ये, वाशिष्ठी नदीच्या प्रवाही पाण्यात आणि ग्रामदैवताच्या श्रद्धेत सांस्कृतिक प्रेमाचा डीएनए दडलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी यांनी हे संमेलन केवळ जागेची रचना बदलणारे नसून विचारांची दिशा बदलणारा प्रयोग असल्याचे सांगितले. कविता इथे केवळ ऐकली जाणार नाही तर अनुभवली जाईल, कथा जमिनीतून उगवलेली वाटेल आणि गाणी रंगमंचावर नाही तर वाऱ्यासोबत झुलताना ऐकू येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. सोनाली खर्चे यांनी लिहिलेल्या आणि अमेय वराडे यांनी संगीतबद्ध केलेल्या बांधावरच्या गीताचे सादरीकरण वीणा परांजपे, सुखदा परांजपे, संगीता जोशी, संध्या आठल्ये, अपर्णा नातू, छाया पोटे, स्नेहल दीक्षित, संजय शिंदे व विजय कदम यांनी केले असून यदुवीर चौगुले यांनी साथसंगत दिली.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ काव्य अभ्यासक विजय जोशी यांनी ‘कविता : तंत्र आणि मंत्र’ या विषयावर केलेल्या विवेचनाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. काव्यगुण, आशयगुण आणि नादलयगुण असलेली कविता आदर्श ठरते. कविता लिहिल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर शेअर करण्याची घाई आजचे कवी करतात, मात्र संस्कारण, परिपक्वता आणि तटस्थतेतून गेलेली कविता अधिक प्रभावी ठरते. जसे लोणचे मुरल्यानंतरच चविष्ट होते, तसेच कविता देखील वेळ घेऊन परिपक्व व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कथाकार सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन झाले. अमोल पालये यांनी तिलोरी बोलीतील तर ज्ञानेश्वर झगडे यांनी खारवी बोलीतील कथांचे सादरीकरण करत रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ‘माती, नाती आणि माणूस’ या विषयावर काव्यसंमेलन रंगले. अरुण म्हात्रे आणि सूत्रसंचालक कैलास गांधी यांच्यातील काव्यनोकझोकमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. मुझफ्फर सय्यद, मंदार ओक, विनय माळी, विजय हटकर, राजेंद्र आरेकर, ईश्वर हलगरे, मेधा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू, श्रद्धा कळंबटे, विराज चव्हाण, राष्ट्रपाल सावंत आदी कवींनी सादर केलेल्या ग्रामीण, शहरी आणि प्रेमकवितांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
समारोप सत्रात डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बांधावरचे साहित्य संमेलन ही अत्यंत उत्कृष्ट आणि आवश्यक संकल्पना असल्याचे सांगितले. शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन तिथल्या मातीत रमणे, पीक पाहणे, स्वच्छ हवा आणि पाण्याचा अनुभव घेणे आणि शेतकऱ्यांचे जीवन जवळून समजून घेणे हे साहित्यिकांसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुभाष लाड यांनी धामणवणे येथील या संमेलनाने त्यांच्या बांधावर घालवलेल्या आयुष्याच्या आठवणी जाग्या केल्याचे सांगत आयोजकांचे मनापासून कौतुक केले.
या संमेलनाची खास ओळख ठरली ती निसर्गपूरक व्यवस्थापन. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला होता. दगड-मातीचा बांध हेच व्यासपीठ होते. काजूच्या झाडांच्या सावलीत बैठक व्यवस्था करण्यात आली होती. निसर्गातील वस्तूंचा वापर करून स्वागत रांगोळी काढण्यात आली होती. झाडांवर पाने, फुले आणि लाकडी फळ्यांवर लिहिलेल्या कविता टांगण्यात आल्या होत्या. पारंपरिक सांस्कृतिक घटकांना मान देत ग्रामदेवतेला स्थानिक बोलीतील गाऱ्हाणे, वारूळ पूजन, दगडी दिव्याद्वारे दीपप्रज्वलन आणि स्थानिक वाद्य ‘संबळ’ यांचे वादन करण्यात आले.
रसिकांसाठी अस्सल कोकणी ग्रामीण शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. झुणका-भाकर, वरण-भात, गावरान भाज्या, तांदळाची खीर तसेच नाश्त्याला केळीच्या पानात आंबोळी-घावणे आणि चटणी, तर चहापानासोबत स्थानिक अल्पोपहार ‘मोंगा-पोपटी’ देण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखेच्या वतीने आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांनी सहकार्य केले. संमेलनाचे संकल्पक व कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, सहकार्याध्यक्ष अरुण इंगवले, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर आणि संयोजन समितीच्या सर्व सदस्यांच्या अथक परिश्रमामुळे हे संमेलन यशस्वीरीत्या पार पडले.
पारंपरिक साहित्य संमेलनांच्या चौकटी मोडून निसर्गाच्या सान्निध्यात माणूस, माती आणि नाती यांचे नाते उलगडणारा हा साहित्यिक सोहळा मराठी साहित्याच्या प्रवासातील एक संस्मरणीय आणि दिशादर्शक टप्पा ठरला असून ‘बांधावरचे साहित्य संमेलन’ ही संकल्पना भविष्यात अनेक ठिकाणी अनुकरणीय ठरेल, असा विश्वास साहित्यप्रेमींनी व्यक्त केला.

