(नाणीज / वार्ताहर)
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने अवघ्या पंधरा दिवसांत तब्बल १ लाख ७१ हजार १५० रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन झाले असून, या रक्तदानामुळे दहापट रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. हे कार्य केवळ सामाजिक उपक्रम नसून एक मोठी अध्यात्मिक क्रांती असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी आज नाणीज येथे काढले.
नाणीज क्षेत्रात रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभूतपूर्व रक्तदान मोहिमेत सहभागी झालेल्या रक्तदात्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आज मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील रक्तसंकलनाची जबाबदारीच जणू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी खांद्यावर घेतली आहे. एका व्यक्तीच्या प्रेरणेने एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन होणे हा जागतिक विक्रम असून सामाजिक कार्य कसे प्रभावीपणे राबवावे याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. कोणतेही औपचारिक निमंत्रण नसताना लाखो भाविक या कार्यासाठी येथे एकत्र आले, हेच त्यांच्या कार्याची पोहोच दर्शवते.
ते म्हणाले, शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेच्या आधी अनेकदा नरेंद्राचार्यजींची रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचते. केवळ माहिती मिळताच काही मिनिटांत मदत पोहोचवणारी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी आहे. या संपूर्ण व्यवस्थेचा अभ्यास शासनाने करावा, कारण मंत्रालयातून जे काम केले जाते, तेच कार्य या पिठातून अधिक परिणामकारकपणे सुरू आहे.
रक्तदान यज्ञाने इतिहास घडवला – आरोग्यमंत्री आबिटकर
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, जगद्गुरुंच्या रक्तदान यज्ञाने इतिहास घडवला आहे. त्यांच्या या चळवळीमागे ठाम अध्यात्मिक अधिष्ठान असून रक्तदान, देहदान आणि अवयवदानाच्या माध्यमातून ते आरोग्य विभागाचे कार्य मोठ्या प्रमाणात समर्थपणे पार पाडत आहेत. सामाजिक, धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रेरणादायी असून या सर्व कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनीही जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना उत्तम व्यवस्थापन गुरु असल्याचे म्हटले. तर परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी, गरिबांच्या उद्धारासाठी सुरू असलेला हा यज्ञ आता कधीही थांबणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास आमदार शेखर निकम, आमदार भय्याशेठ उर्फ किरण सामंत, अभिनेते आनंद कारेकर, रक्त संकलन परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप, पंचायत समिती सदस्या डॉ. पद्मजा कांबळे, सरपंच विनायक शिवगण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

