(संगमेश्वर / एजाज पटेल)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून मुचरी जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या लढतीत शिंदे सेनेच्या माधवी गिते यांनी विजय मिळवला आहे. या गटात माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या माधवी गिते या पूर्वी शिवसेना एकसंघ असताना कार्यरत होत्या. शिवसेना फुटीनंतर त्या शिंदे सेनेत गेल्या होत्या. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून ललिता तांबे या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या.
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच या दोघींमध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वातावरण चांगलेच तापले होते. अखेर निकालाच्या दिवशी माधवी गिते यांनी बाजी मारली. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
दरम्यान, या गटात मुचरी व माभळे असे दोन पंचायत समिती गण येतात. मुचरी गणातून आरुषी घवाळी यांना मतदारांनी स्वीकारले असून त्या आमदार शेखर निकम यांचे निकटवर्तीय आनंद घवाळी यांच्या पत्नी आहेत.
माभळे गणात शिंदे गटाचे सुहास मायंगडे व उद्धव ठाकरे गटाचे दिलीप गिते यांच्यात खरी लढत होणार असल्याचे चित्र होते. मात्र मतमोजणीदरम्यान सुहास मायंगडे यांनी आघाडी घेत अखेर विजय मिळवला. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला.
या निकालामुळे मुचरी परिसरात शिंदे सेनेचे वर्चस्व अधोरेखित झाले असून उद्धव ठाकरे गटाला या गटात पराभव स्वीकारावा लागला आहे. या जय-पराजयाचे पडसाद आगामी स्थानिक राजकारणावर उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

