(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी सारख्या ग्रामीण भागातील युवा साहित्यिक अरुण मोर्ये यांना ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र यांचा यावर्षीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून युवापिढीला साहित्याकडे वळविण्यासाठी व नवसाहित्यिक घडविण्यासाठी कोमसापच्या युवाशक्ती मार्फत विविध साहित्यिक उपक्रम राबवून मोलाचे योगदान देणारे अरुण मोर्ये हे कोमसाप युवाशक्तीचे दक्षिण कोकण विभाग (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग) युवाशक्तीचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
आजवर अरुण मोर्ये यांचे चारोळी संग्रह, कवितासंग्रह, नाटके व प्रतिलिपी सारख्या ऑनलाईन ॲपवर साहित्य प्रकाशित असून त्यांनी केलेल्या विपुल लिखाणापैकी कवितासंग्रह, कथासंग्रह, व नाटके नजीकच्या काळात प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोशल मीडियावर व मासिकांतून त्यांचे अनेक लेख, कविता सातत्याने प्रकाशित होत असतात. याआधी कवी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी पुणे यांच्या “कवी केशवसुतांचे वारसदार कवी” या पुरस्काराने ही अरुण मोर्ये यांना सन्मानित करण्यात आले आहेत.
अरुण मोर्ये यांना नुकत्याच जाहीर झालेल्या या “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा साहित्यरत्न” पुरस्कारामुळे साहित्यिक वर्तुळातून व मित्रमंडाळातून अरुण मोर्ये यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

