(नवी दिल्ली)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान केवळ चर्चेचा विषय न राहता आता प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने आपला प्रभाव वाढवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या एआय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत भारताचे पहिले स्वदेशी बहुभाषिक दस्तऐवज एआय मॉडेल ‘सर्वम व्हिजन’चे अनावरण केले आहे. या उपक्रमामुळे देशांतर्गत स्वतंत्र एआय इकोसिस्टिम उभारण्याला मोठी चालना मिळणार आहे.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावरून ‘सर्वम व्हिजन’ या एआय मॉडेलविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारताच्या एआय मिशनअंतर्गत सर्वम एआयने विकसित केलेल्या या प्रगत मॉडेलची सखोल तांत्रिक चाचणी करण्यात आली असून, ते सर्व कठोर निकषांवर खरे उतरले आहे. समीक्षकांनी या मॉडेलचे विशेष कौतुक केल्याचेही त्यांनी नमूद केले.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतातील तरुण आणि प्रतिभावान अभियंते साहित्य विज्ञान, आरोग्य सेवा, सायबर सुरक्षा आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पनांवर काम करत आहेत. ‘सर्वम व्हिजन’ हे मॉडेल जागतिक स्तरावरही क्रांतीकारक ठरण्याची क्षमता ठेवते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वम एआयचे ‘सर्वम व्हिजन’ काय आहे?
भारताच्या आघाडीच्या एआय स्टार्टअप सर्वम एआयने विकसित केलेले ‘सर्वम व्हिजन’ हे एक प्रगत मल्टिमॉडल एआय मॉडेल आहे. हे मॉडेल दस्तऐवज बुद्धिमत्ता (Document Intelligence), ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR), दृश्य भाषा समज आणि भारतातील विविध भाषा व लिपी ओळखण्यात सक्षम आहे. ऐतिहासिक दस्तऐवज, शिलालेख, ताडपत्रावरील मजकूर, जुने ग्रंथ आणि अभिलेख यामधील ज्ञान डिजिटल स्वरूपात आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे.
सर्वम एआयच्या दाव्यानुसार, हे बहुभाषिक एआय मॉडेल जेमिनी 3 प्रो, GPT-5.2 यांसारख्या आघाडीच्या जागतिक एआय मॉडेल्सपेक्षा काही निकषांवर अधिक प्रभावी ठरले आहे. विशेषतः भारतीय भाषांतील दस्तऐवज प्रक्रिया आणि अचूकतेच्या बाबतीत ‘सर्वम व्हिजन’ सरस ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
२२ भारतीय भाषांमध्ये प्रभावी कामगिरी
सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ‘सर्वम व्हिजन’ या एआय मॉडेलने मराठी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, उर्दू, आसामी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू यांसह २२ अधिकृत भारतीय भाषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. यामुळे बहुभाषिक दस्तऐवजांची अचूकता, विश्वसनीयता आणि माहिती प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे.
या स्वदेशी एआय मॉडेलमुळे प्रशासन, शिक्षण, संशोधन, सांस्कृतिक वारसा जतन आणि डिजिटल गव्हर्नन्स या क्षेत्रांना मोठा फायदा होणार असून, भारताला जागतिक एआय नेतृत्वाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकता येणार आहे.

