(चाफे / हरेश गावडे)
मुंबई विद्यापीठ विभागाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठी आयोजित करण्यात आलेला ‘उडान महोत्सव’ यंदा मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चाफे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात मयेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
या महोत्सवात पथनाट्य, वक्तृत्व, सृजनशील लेखन, पोस्टर स्पर्धा, पोवाडा गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील १८ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. पोस्टर स्पर्धेत मयेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रेया विजय पाटील (तृतीय वर्ष वाणिज्य) हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच पोवाडा गायन स्पर्धेत कु. निलम निंबरे, कु. रुची वीर, कु. रसिका आलीम, कु. निशा शीतप आणि कु. गौरी पवार यांनी प्रभावी सादरीकरण करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव मुंबई विद्यापीठाच्या विस्तार विभागाचे मा. प्रा. डॉ. कुणाल जाधव आणि मा. प्रा. डॉ. विश्वंभर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रोहित मयेकर, संचालक श्री. सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. स्नेहा पालये तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत कु. श्रेया पाटील हिची विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

