(जाकादेवी / वार्ताहर)
धम्मक्रांती कला मंच रत्नागिरी तालुक्याच्या वतीने कोट्यावधी भारतीयांची माता, ज्ञान सूर्याची सावली,त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने जाकादेवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जाकादेवी- खालगाव येथे रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. गीत गायन व नाट्य अभिनयाचा विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रविवारी सकाळी १० वा.दीप प्रज्वलन व बुद्ध वंदना, १०.३० वा. मान्यवरांचे स्वागत, सकाळी ११ वा. ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान सोहळा, दु. १२ वा. मान्यवरांच्या शुभेच्छा तर १२.३० वा. अल्पोपहार दु.२ वाजता त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर लक्षवेधी आणि अनुकरणीय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये गीत गायन व नाट्य अभिनयाचा समावेश आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील अनेक शाखांना गीत गायनाची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमांची नोंदणी केलेल्या शाखांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या सर्व कार्यक्रमांस बौद्ध अनुयायी, बुद्ध, शिवराय, फुले, शाहू आंबेडकरी, चळवळीतील कार्यकर्ते, तसेच आंबेडकरी विचारधारेच्या नागरिकांनी, महिला, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धम्मक्रांती कला मंच रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष रविकांत पवार, कार्याध्यक्ष मिलिंद कांबळे, उपकार्याध्यक्ष प्रशांत मोहिते, चिटणीस सतीश कदम यांनी कला मंचातर्फे केले आहे. रत्नागिरी तालुक्यातील कलाकारांना नवसंजीवनी देण्यासाठी हा उपक्रम रत्नागिरी कला मंचाने आयोजित केला आहे.

