(मुंबई / वार्ताहर)
कोकणातील अपरिचित प्राचीन लेणी, कातळशिल्पे आणि दुर्लक्षित ऐतिहासिक वारसास्थळांचा शोध घेऊन त्यांचा इतिहास व सांस्कृतिक महत्त्व समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने ‘लेणी संवाद’च्या वतीने तीन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रफुल्ल पुरळकर यांनी ९ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राजापूर ते देवगडदरम्यान हा अभ्यास दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात एकूण ९ एकाश्म लेणी आणि ३ कातळशिल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा अभ्यास करण्यात आला.
राजापूर तालुक्यातील कोदवली, गोठणे-दोनिवडे आणि पांगरे बुद्रुक या तीन ठिकाणी असलेल्या एकूण आठ एकाश्म लेण्यांची पाहणी करण्यात आली. याशिवाय चुना कोळवण येथील सवतकडा धबधबा आणि कोदवली येथील सायबाचे धरण या ठिकाणांनाही भेट देण्यात आली. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील एका एकाश्म लेणीची पाहणी करण्याबरोबरच पाळेकरवाडी, बापर्डे आणि पडेल येथील तीन कातळशिल्पांचाही अभ्यास करण्यात आला. तसेच वाडा-गावठाण येथील टिपवणे परिसरात असलेल्या जुन्या पाण्याच्या कुंडाची पाहणी करून त्यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यात आली.
या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वितेसाठी देवगड तालुक्यातील आयु. गुरुनाथ सावंत, आयु. सूर्यकांत साळुंखे, आयु. विशाल साळुंखे, सुशील मणचेकर, अमित पुरळकर आणि रणजित हिर्लेकर, तसेच राजापूर येथील विनोद पवार, प्रवीण पवार, दीपक सागवेकर, अनंत जानस्कार, प्रकाश जानस्कार आणि अक्षय गिजम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्रातील अपरिचित लेणी, कातळशिल्पे आणि दुर्लक्षित प्राचीन वारसास्थळांचा शोध घेऊन त्यांची माहिती संकलित करण्याचे काम प्रफुल्ल पुरळकर हे ‘लेणी संवाद / एकजूट लेणी समूह’च्या माध्यमातून सातत्याने करत आहेत. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्रातील अनेक अपरिचित लेण्यांना भेटी देऊन त्यांचा अभ्यास केला असून, संबंधित माहिती संकलित करण्याचे कार्य केले आहे.
प्रफुल्ल पुरळकर यांचे मूळ गाव देवगड तालुक्यातील पुरळ असून, सध्या ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत. कोकणातील अनेक प्राचीन लेणी, कातळशिल्पे आणि ऐतिहासिक वारसास्थळे अद्यापही पुरेशा प्रमाणात प्रकाशझोतात आलेली नाहीत. अशा स्थळांचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्यांचा इतिहास, स्थापत्यवैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम यापुढेही सातत्याने सुरू ठेवणार असल्याचा निर्धार प्रफुल्ल पुरळकर यांनी व्यक्त केला.


