(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना सन २०२१ ते २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, प्रकरणाची माहिती सोशल मीडियावर प्रसारित होताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दिलीप ज्ञानेश्वर जाधव (वय ४५, मूळ रा. सावर्डे, ता. चिपळूण, सध्या रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्राध्यापकाचे नाव आहे. पीडिता इयत्ता दहावीत असतानाच तिची संशयिताशी ओळख झाली होती. त्यानंतर अकरावीच्या शिक्षणासाठी तिने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर, संशयित प्राध्यापकाने तिचा विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.
दीर्घकाळ मानसिक तणावाखाली असलेल्या पीडितेने अखेर आपबिती नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

