(धुळे)
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे लग्नाच्या आनंदावर विरजण पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नापूर्वी आयोजित हळदी समारंभात किरकोळ वादातून उफाळलेल्या भीषण हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी, 19 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे एकच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ शेअर केल्याने वातावरण आधीच तणावपूर्ण झाले होते. गुरुवारी पिंपळनेर येथे हळदीचा कार्यक्रम सुरू असताना नवरदेव व नवरीकडील पाहुण्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळातच हा वाद हिंसक हाणामारीत रूपांतरित झाला.
नवरदेवाच्या बाजूने आलेल्या काही तरुणांनी नवरीकडील मंडळींवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुरेश सुपडुगिर गोसावी (55), साहील सुरेशगिर गोसावी आणि देवा रवींद्र पवार (35) हे तिघे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच साहिल सुरेश गोसावी, पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींपैकी एकाला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेमागे मोठी पूर्वनियोजन असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप स्टेटसवर जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा दावा अशोक गिरी यांनी केला आहे. ही धमकी गांभीर्याने घेतली असती तर कदाचित आज हा भीषण रक्तपात टाळता आला असता, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे. लग्नपत्रिकेतील नावाच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. या रक्तरंजित घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र हळदी समारंभात घडलेल्या या हिंसाचारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

