( मुंबई )
मुंबई महापालिका महापौरपदासाठी मनसे सत्ताधारी भाजपला पाठिंबा देणार, अशी जोरदार चर्चा सोमवारी सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चांना स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “मी सांगतो ना, नाही म्हणजे नाही,” अशा ठाम शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली.
मुंबई महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांची सध्या गटनोंदणी प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी मनसे महापौरपदासाठी भाजपच्या बाजूने भूमिका घेणार, अशा अफवा पसरल्या होत्या. याचवेळी राज ठाकरे वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेत होते. या बैठकीला पक्षातील काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते.
बैठकीनंतर राज ठाकरे बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी या चर्चांबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी कोणतीही संदिग्धता न ठेवता, “नाही म्हणजे नाही,” असे सांगत मनसेकडून भाजपला पाठिंबा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्थानिक पातळीवर दिलेल्या पाठिंब्यामुळे पक्षावर टीका झाली होती. या निर्णयाबाबत राज ठाकरे स्वतःही नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, मनसे भविष्यात राजकारणात लवचिक भूमिका घेईल. मात्र ही भूमिका वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी नसून मनसे आणि मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
एमआयजी क्लबमधील बैठकीत राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवाची सविस्तर झाडाझडती घेतली. उमेदवारांकडून पराभवाची कारणे जाणून घेण्यात आली असून, त्याआधारे येत्या काळात मनसेत पक्षांतर्गत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणे बदलत असताना, मनसेची भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे महापौरपदासाठी भाजपला मनसेचा पाठिंबा मिळणार नसल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

