(दापोली)
सरस्वती विद्यामंदिर, जालगाव येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा भव्य समारोप ५ डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे कौतुक करत मनोगते व्यक्त केली.
ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार ही काळाची गरज आहे, आणि हे गुण सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि व्यवस्थापनात दिसून येत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. इस्पायर अवॉर्ड स्पर्धेत यश मिळवून दापोली तालुक्याचे नाव राज्यभर गाजवणाऱ्या आसावरी देवगीरीचे विस्तार अधिकारी सुधाकर गायकवाड यांनी विशेष अभिनंदन केले.
या विज्ञान महोत्सवात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नवोन्मेषी कल्पना, तांत्रिक मॉडेल्स, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि STEM क्षेत्रातील उपक्रम यांनी सर्वांचे मन जिंकले.
गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी मनोगतात सांगितले, “विज्ञान प्रदर्शन हे केवळ एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देणारे आणि ‘करून शिकणे’ संस्कृती वाढवणारे व्यासपीठ आहे. १९५ शाळांचा सहभाग हा अत्यंत अभिमानास्पद आहे.”
त्यांनी शाळा व्यवस्थापन, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, समित्या, सहाय्यक कर्मचारी आणि परीक्षक मंडळ यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. “या सर्वांच्या समन्वय आणि प्रेरणेमुळेच हा उपक्रम संस्मरणीय ठरला,” असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात समीर गुजराथी म्हणाले, “भाषा ही केवळ माध्यम असते; शिकण्याची पद्धत महत्त्वाची. बक्षिसापेक्षा सहभाग अधिक मोलाचा, कारण सहभागाशिवाय यश शक्य नाही.”
विजेते: प्रदर्शनात यशस्वी शाळा पुढीलप्रमाणे
गट १ : सहावी ते आठवी
प्रथम: स्मार्ट वॉटर कन्झर्वेशन – नॅशनल हायस्कूल, दापोली
द्वितीय: गोठ्यातील प्राण्यांची सुटका प्रणाली – यू.ए. दळवी इंग्लिश मिडियम
तृतीय: कार्बन अब्सॉर्बर – सरस्वती विद्यामंदिर, जालगाव
गट २ : नववी ते बारावी
प्रथम: AI आधारित वेस्ट मॅनेजमेंट – नॅशनल हायस्कूल
द्वितीय: पालेभाजी चिरणी यंत्र – एम.के. इंग्लिश स्कूल, आंजर्ले
तृतीय: स्मार्ट कचरा कुंडी – सरस्वती विद्यामंदिर
दिव्यांग विद्यार्थी (प्राथमिक गट)
प्रथम: ऑटोमॅटिक प्लांट वॉटरिंग – ए.जी. हायस्कूल
द्वितीय: प्लेस व्हॅल्यू – संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम
तृतीय: भूकंप सूचक यंत्र – एम.के. स्कूल, आंजर्ले
दिव्यांग (नववी–बारावी गट)
प्रथम: गॅस डिटेक्टर – ए.जी. हायस्कूल
द्वितीय: मॅजिकल छत्री – सारंग पंचक्रोशी
तृतीय: घाटवळणावरील अपघात सूचक यंत्र – मथुरभाई बुटाला हायस्कूल, गावतळे
प्रश्नमंजुषा स्पर्धा
प्रथम: नॅशनल हायस्कूल
द्वितीय: ए.जी. हायस्कूल
शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा
प्राथमिक: विनय राणे (प्रथम)
माध्यमिक: राजेंद्र हिंग्लजे (प्रथम)
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शशी बैकर यांनी केले व आभारप्रदर्शन करून सोहळ्याची सांगता केली. संस्थेचे अधिकारी, शिक्षक, नोडल अधिकारी बळीराम राठोड, विस्तार अधिकारी जलील वलेले, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

