(रत्नागिरी)
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काम केल्याच्या ठपका ठेवत माजी जिल्हा परिषद सभापती तसेच युवा सेना कोकण विस्तारक परशुराम कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी जाहीर पत्रकाद्वारे केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
परशुराम कदम हे शिंदे गटाच्या शिवसेनेत युवा सेना कोकण विस्तारक या पदावर कार्यरत होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील ३५ हातखंबा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुयोग नंदकुमार कांबळे यांच्याविरोधात त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ही कृती पक्षसंघटनेच्या आणि पक्षशिस्तीच्या विरोधात असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचे स्पष्ट कारण नमूद करत परशुराम कदम यांची त्यांना देण्यात आलेल्या पदांवरून तसेच शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातूनही हकालपट्टी करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
या कारवाईमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत शिस्त आणि राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित झाले असून, या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, आपल्या वैयक्तिक अडचणीमुळे केदार उर्फ मुन्ना देसाई यांनी आपल्या युवा सेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख (द) यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

