( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जलरंगावर प्रभुत्व असणारे आणि संगमेश्वर तालुक्याच्या सोनवडे येथील ग्रामीण भागात वास्तव्याला असणाऱ्या निसर्ग चित्रकार विष्णु परीट यांनी त्यांच्या जादुई कुंचल्याने आजवर राज्य राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत. गेल्या चाळीस वर्षांपेक्षा अधिककाळ जलरंगात चित्र साकारताना अनेक प्रयोग केल्यानंतर त्यांनी आपल्या कुंचल्यावर प्रभुत्व मिळवले आहे. निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांचे नाव आता आंतरराष्ट्रीय यादीत झळकले असून आर्ट एव्हेन्यू या आंतरराष्ट्रीय कला संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन निसर्गचित्र स्पर्धेत विष्णू परीट यांच्या दोन चित्रांची निवड झाली आहे.
आर्ट एव्हेन्यू या आंतरराष्ट्रीय कला संस्थेच्या क्यूरेशनखाली आयोजित करण्यात आलेल्या ब्रूकलीन इंटरनॅशनल अवॉर्ड – आर्ट अँड फोटोग्राफी प्रदर्शन जानेवारी २०२६ मध्ये आयोजित केले होते. या स्पर्धेसाठी जगभरातून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवण्यात आला.या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या १३५२ कलाकृतिपैकी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय १०५ कलाकार व छायाचित्रकारांच्या १८० कलाकृतीची निवड परीक्षक समितीने केली. निवड प्रक्रियेत उच्च दर्जा, सर्जनशीलता आणि कलात्मक वैविध्य यांना प्राधान्य देण्यात आले.
वरील १८० कलाकृतीतून परत अंतिम १० अवॉर्ड विनर, २६ मेरिट अवार्ड व ३९ आउटस्टँडिंग अवॉर्ड अशा एकूण ७५ कला कृतिची निवड झाली. या ऑनलाईन स्पर्धेचा व्हिडिओ युट्युबवर २० फेब्रुवारी पर्यंत पाहता येणार आहे. निसर्ग चित्रकार विष्णू परीट हे निसर्गाकडे पहात असताना नेहमीच वेगळ्या दृष्टीने निसर्ग निहाळत असतात. निसर्गातील प्रत्येक घटक त्यांना हातात कुंचला घेण्यासाठी प्रवृत्त करत असतो. निसर्गाच्या आनंददायी छटा त्यांना नेहमीच कलाकृती साकारण्यासाठी प्रवृत्त करत असतात. यातूनच वर्षभरातील विविध हंगामात निसर्गातील सर्व हालचाली आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न चित्रकार विष्णू परीट सातत्याने करत असतात. सातत्यपूर्ण सराव आणि कलाकृती साकारताना केलेले नवनवीन प्रयोग यामुळेच ते निसर्गाचे हुबेहूब दर्शन घडवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. चित्रकार विष्णू परीट यांची राज्याच्या विविध भागात आजवर अनेक निसर्ग चित्र प्रदर्शने संपन्न झाली असून त्यांना कला संचालनालयाचा उत्कृष्ट निसर्गचित्र कलाकृती अवॉर्ड प्राप्त झाला आहे. नुकतेच त्यांच्या एका चित्राची आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनासाठी निवड झाले आहे.
नित्य सरावासाठी आणि कुंचल्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत कलारसिकांना निसर्गाचं खरोखर दर्शन व्हावं म्हणून चित्रकार विष्णू परीट दररोज एक कलाकृती साकारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांनी आजवर निसर्गचित्रांच्या शेकडो कलाकृती साकारल्या आहेत. आर्ट एव्हेन्यू या आंतरराष्ट्रीय कला संस्थेच्या ऑनलाइन प्रदर्शनासाठी निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांच्या कलाकृतींची निवड झाल्याबद्दल त्यांचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य चित्रकार माणिक यादव, चित्रकार अमित सुर्वे, विक्रांत बोथरे, प्रदीप कुमार देडगे, शिल्पकार रुपेश सुर्वे , चित्रकार मनोज सुतार, रंगनाथ मोरे, नाना हजारे, कलारसिक प्रा. धनंजय दळवी, कलाशिक्षक सुरज मोहिते, उद्योजक विक्रांत दर्डे आदींनी अभिनंदन केले आहे.
कलाकृती कलारसिकांजवळ संवाद साधणारी असावी
जलरंगातील चित्र गावाकडच्या घराभोवताली असणाऱ्या शांत आणि आत्मीय वातावरणाचं दर्शन घडवतं. झाडांच्या सावलीत विसावलेलं मातीच अंगण, कौलारु घरांची साधी रचना आणि प्रकाश-सावलीचा नाजूक खेळ या चित्रात सहजपणे उलगडतो. जलरंगाच्या हलक्या रेखाटना मधून मधून निसर्गआणि मानवी जीवनातील साधेपणा अधोरेखित केला आहे. हे चित्र पहाणा-याला आपल्या भूतकाळातील आठवणींना जोडून ठेवते. समुद्राच्या बाहय दृश्यापेक्षा त्याच्या अंतर्गत शांततेचा शोध घेतला आहे. सतत हालचाल करणाऱ्या लाटा, स्थिर खडक, आणि आकाशातील मृदू रंगछटा या सगळ्यामधून निसर्गातील विरोधाभास मला आकर्षित करतो जलरंगाच्या पारदर्शकतेतून पाण्याची खोली, ओलसर वाळूची संवेदना आणि क्षितिजावरील अस्पष्टता व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. रंगांची मर्यादित मांडणी ही निसर्गाशी संवाद साधण्यासाठी जाणीवपूर्वक ठेवलेली आहे. या चित्रातून मानवाने समुद्रा सारखीच अंतर्मुख शांतता अनुभवावी अशी माझी भावना आहे.
— विष्णू परीट, निसर्ग चित्रकार

