(चिपळूण)
चिपळूण शहरातील बुरुमतळी परिसरात आज सोमवारी (२ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र, अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारच्या दर्शनी भागाचे गंभीर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण बस स्थानकातून सुटलेली हडकणी–चिपळूण एसटी बस पाग नाका मार्गे बुरुमतळी परिसरात आली असताना समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. धडकेनंतर कार काही अंतर फरफटत गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची तीव्रता पाहता कारचालकाचा थोडक्यात बचाव झाला.
अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून, रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.
दरम्यान, बुरुमतळी व पाग नाका परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे येथे वाहतूक नियंत्रणासाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

