(रत्नागिरी)
वित्तीय सेवा विभाग (DFS), वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार दिनांक 01.10.2025 ते 31.12.2025 या कालावधीत निष्क्रिय ठेव रक्कम (Unclaimed Deposits) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक 29.12.2025 रोजी पंचायत समिती संगमेश्वर (देवरूख) येथे निष्क्रिय ठेव रक्कमबाबत जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. निष्क्रिय ठेव रक्कम म्हणजे 10 वर्षांहून अधिक कालावधीसाठी वापरात नसलेल्या ठेवी, ज्या RBI च्या Depositor Education and Awareness Fund (DEAF) मध्ये वर्ग केल्या जातात व योग्य कागदपत्रांवर खातेदार किंवा वारसदारांना परत मिळू शकतात.
या शिबिरास भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रबंधक कु. बेनज़िर शेख या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. बँक ऑफ इंडियाचे उपआंचलिक प्रबंधक श्री. अंजनी कुमार सिंह आज़ाद यांनी निष्क्रिय ठेवी टाळण्यासाठी Re-KYC व खात्यास नामनिर्देशन आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, बँकिंग कायद्यातील अलीकडील सुधारणा अनुसार एका खात्यासाठी चार व्यक्तींपर्यंत नामनिर्देशन करता येते, अशी माहिती देऊन नागरिकांनी कुटुंबातील प्रलंबित दावे असल्यास संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरास 260 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी निष्क्रिय ठेव प्राप्त झालेल्या विविध लाभार्थ्यांना त्यांच्या बँकांमार्फत प्रशस्तीपत्र देण्यात आले. या शिबिरामुळे स्थानिक लोकांना निष्क्रिय ठेवी (Unclaimed Deposits) बाबत जनजागरूकता निर्माण झाली. या शिबिराचे यशस्वी आयोजन बँक ऑफ इंडिया देवरूख शाखा टीमने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. दर्शन दत्ताराम कानसे यांनी केले. सोबतच या कार्यक्रमात बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आरडीसीसी बैंक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, एचडीएफसी बँक व भारतीय स्टेट बँकेने तसेच इतर इन्शुरेंस कंपनीने सहभाग घेतला.

