(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील इ.१० वी १२वी विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सलग १२ दिवसांचे विशेष अभ्यास शिबीर सुरू करण्यात आले आहे. या शिबीराचा उद्घाटन सोहळा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार, अरुण कांबळे, माध्यमिक विभागाचे शिबीर प्रमुख अमित बोले, ज्युनिअर कॉलेज शिबीर प्रमुख संदीप कुराडे, अनिल पाटील, राहुल यादव आदी उपस्थित होते. इयत्ता १२ वी सलग ८ दिवस तर इयत्ता १० वीचे १२ दिवस हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्वागत शिबीर प्रमुख अमित बोले यांनी, सूत्रसंचलन संतोष पवार यांनी तर आभार राहुल यादव यांनी मानले.
शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर, सचिव विनायक राऊत , सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, संस्थेचे सल्लागार उमेश अपराध (कोल्हापूर)यांनी शुभेच्छा दिल्या. गुणवत्ता वाढीसाठी हे शिबीर विद्यार्थ्यांना लाभदायक ठरते. शिबीरात वाचन व लेखन या विषयांवर अधिक भर दिला जातो.
गेल्या अनेक वर्षापासून प्रतिवर्षी असे अभ्यास शिबीर घेतले जाते. या शिबीरात ३८२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शिबीर यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मेहनत घेत आहे.

