(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील तुळजाभवानीनगर परिसरात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. बोलेरो वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनोहर आत्माराम मेस्त्री (वय ७०, रा. सांगवे वरचीवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम रामकृष्ण मेस्त्री (वय २०, रा. सांगवे वरचीवाडी) हा आपल्या ताब्यातील हीरो होंडा स्प्लेंडर (MH 05 AA 9486) दुचाकीवरून चुलत काका मनोहर मेस्त्री यांना कोसुंबहून साडवलीकडे घेऊन येत होता. त्याचवेळी प्रतिक नरेश शिंदे (वय २५, रा. मुंबई) हा आपल्या ताब्यातील महेंद्रा बोलेरो (MH 01 JE 4606) घेऊन संगमेश्वरहून देवरूखच्या दिशेने जात होता.
साडवलीतील वनाज कंपनीजवळ तुळजाभवानीनगर येथे दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मनोहर मेस्त्री गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी मनोहर मेस्त्री यांना तत्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मनोहर मेस्त्री यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ, एक बहीण, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने सांगवे व साडवली परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

