(संगमेश्वर / एजाज पटेल)
प्रजासत्ताक दिनानिमित्त शास्त्री परिसर विद्या विकास संस्थेच्या नवजीवन विद्यालय, फुणगूस येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ८ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. शाळेचे माजी शिक्षक सन्माननीय श्री. श्रीधर जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. सुनील आनंदराव पाटील यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत दिनाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाला निवृत्त पोलीस श्री. कृष्णात (आबा) भोसले, निवृत्त माजी सैनिक श्री. धनाजीराव पाटील, व्यावसायिक श्री. गजानन लांजेकर, ग्रामस्थ श्री. नाना भोसले, सौ. वैशाली नलावडे, सौ. तब्बसुम खान, माजी विद्यार्थी श्री. प्रमोद शिंदे, श्री. संदीप पवार, सौ. श्रद्धा भोसले, श्री. जयतेश कदम तसेच चिमुकल्या पूर्वी लांजेकर व माऊ भोसले उपस्थित होते.
राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत गायनानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एरोबिक डान्स व्यायाम आणि सामुदायिक कवायत सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स व लेझीम कवायत सादर केली, तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी घुंगरकाठी कवायत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बैठी कवायत विशेष आकर्षण ठरली.
दरवर्षीप्रमाणे रिक्षा चालक-मालक संघटना तसेच ग्रामस्थ श्री. आबा भोसले, श्री. प्रकाश भोसले व माजी सैनिक श्री. पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यासोबतच श्री. मुज्जमिल मुजावर यांनी केळी व बिस्किटे, श्री. प्रमोद शिंदे यांनी जिलेबी, तर श्री. जोशी यांनी खाऊसाठी १,००० रुपयांची रोख देणगी दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. उपस्थित मान्यवर व देणगीदारांचे आभार सौ. कारंडे मॅडम यांनी मानले.
या उपक्रमाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. चंदूभाई देशपांडे, सचिव श्री. दिलीपभाई कुळकर्णी, उपाध्यक्ष डॉ. अरुण डिंगणकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. घडशी यांनी केले. शेवटी मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील यांनी कार्यक्रम समाप्तीची घोषणा करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत घरी जाण्याच्या सूचना दिल्या.

