(चिपळूण)
ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणचा मासिक स्नेहमेळावा बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी संघाच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याचे अध्यक्षस्थान संघाचे अध्यक्ष श्री. उस्मान बांगी यांनी भूषवले. मंचावर उपाध्यक्ष श्री. उदय वेल्हाळ, सचिव सौ. रत्नमाला कळंबटे आणि कोषाध्यक्ष श्री. शांताराम कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने झाली. श्री. बांगी यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन, औक्षण करून आणि केक कापून करण्यात आला. हा उपक्रम सौ. नीला पेंडसे, मंजिरी नरवणे आणि वृषाली खाडे यांनी पार पाडला.
१०१ वर्षांचे शांताराम तांबे केंद्रस्थानी
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते संघाचे ज्येष्ठ सभासद श्री. शांताराम परशुराम तांबे, वय १०१ वर्षे. अजूनही खणखणीत आवाज, चांगले आरोग्य आणि स्वावलंबी जीवनशैली यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. थोडं ऐकण्याचं प्रमाण कमी असलं तरी ते संवाद साधतात आणि दैनंदिन कामे स्वतः करतात. त्यांचा मुलगा श्री. प्रवीण तांबे यांनी गुढे येथून त्यांना वाहनाने आणले, तर श्री. नंदकुमार तांबे यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला.
तांबे आजोबांचे औक्षण पाच सुवासिनींनी केले. अध्यक्ष श्री. बांगी यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ. नीला पेंडसे यांनी धोतराचे पान देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
मनोगतात श्री. तांबे म्हणाले, तुम्हा सर्वांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक घटना, जसे महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चवदार तळे सत्याग्रह, प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले.
या स्नेहमेळाव्यास सुमारे ८० सभासद उपस्थित होते. श्री. रत्नाकर थत्ते यांनी आपल्या शालेय जीवनातील कविता सादर केल्या. अपर्णा कांबळे, माधवी भागवत, प्रतिमा चितळे यांनी सुरेल गाणी गायली, तर माधुरी मंडपे यांनी चारोळ्या सादर केल्या. विजयालक्ष्मी भोसले यांनी नाट्यगीताने रंग भरला.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सभासदांनी विविध कलाप्रदर्शनातून आपली कला सादर केली. तसेच पूरग्रस्तांसाठी देणगी संकलन करून ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघाला देणगी देणाऱ्यांमध्ये नथुराम सावरटकर, सुभाष जोशी, विजय सैतवडेकर, विश्वास देवधर, प्रभाकर सुर्वे, सुमन धारप, उज्वला जोशी, धनश्री नाटुस्कर, अपर्णा कांबळे, विजय भागवत आणि शांताराम कदम यांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्ष्मण कांबळे, बजरंग दाभोळे, अ. गनी वनकर, विजय बापट आणि सुरेश जाधव यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली, आणि उपस्थितांनी परस्पर स्नेह वाढवित आनंदी वातावरणात स्नेहमेळाव्याची सांगता केली.
फोटो : चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाचे सभासद शांताराम तांबे यांना १०१व्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देताना संघाचे अध्यक्ष उस्मान बांगी व उपाध्यक्ष उदय वेल्हाळ

