(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कुवारबाव महालक्ष्मी नगर येथे कार्यरत असलेल्या तीन आदर्श शिक्षिकांचा यामध्ये आदर्श शिक्षका म्हणून पुरस्कार पटकावलेल्या सुप्रिया चित्रसेन साळवी, सौ. नंदिनी नरेंद्र मयेकर आणि श्रद्धा संदीप खामकर या तिन्ही शिक्षिका या शाळेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने या तिन्ही आदर्श शिक्षिकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने जाहीर शुभेच्छा सत्कार समारंभ संपन्न झाला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सौ. सुप्रिया साळवी यांनी ३९ वर्षे ६ महिने, सुप्रिया नंदिनी मयेकर यांनी ३८ वर्ष तर श्रद्धा खामकर यांनी ३६ वर्ष अविरतपणे सेवा बजावली. या तिन्ही शिक्षिकांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत अतिशय प्रामाणिक सेवा केली. या शिक्षिकांनी तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यत विविध स्पर्धामध्ये विद्यार्थी चमकवले आहेत. या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मनिष चाळके यांच्या हस्ते शुभेच्छा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मुख्याध्यापक श्री. मस्के, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सुवरे उपस्थित होत्या. या शुभेच्छा समारंभात शाळेतील शिक्षक, विद्यार्थी गावातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी यांनी आदर्शवत कामगिरी केलेल्या शाळेतील शिक्षिकांचा भाषणातून यथोचित सन्मान केला. बुके, गुलाबपुष्प, भेटवस्तू देऊन त्यांना भविष्यकालीन वाटचालीला सुयश चिंतले.कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते..कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विषय तज्ज्ञ समिर जाधव यांनी केले.