( संगमेश्वर / प्रतिनिधी )
चिपळूण येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी,संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात इको क्लबच्या माध्यमातून शाळेच्या परसबागेत विद्यार्थ्यांनी उत्साहात पालेभाज्या व औषधी वनस्पतींची लागवड केली.विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून शेती आणि निसर्गाची ओळख व्हावी, या उद्देशाने या अभिनव उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या उपक्रमाला चिपळूणचे उपविभागीय कृषी अधिकारी व आपल्या शाळेचे पालक शिवाजी रमण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी भिमाशंकर कोळी व जयेश काळुखे यांनी प्रत्यक्ष लागवड कशी करावी, खतांचा वापर आणि रोपांची निगा कशी राखायची, याबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांना सविस्तर प्रात्यक्षिक दाखवले.तसेच महाविस्तार ॲप याबद्दल अधिक माहिती दिली.
शाळेच्या परसबागेत विद्यार्थ्यांनी स्वतः श्रमदान करून विविध भाज्यांची लागवड केली. यामध्ये प्रामुख्याने कोथिंबीर, पालक, मुळा, हिरवा माठ, लाल माठ यांसारख्या पालेभाज्या तसेच गवार, भेंडी, वांगी आणि मिरची अशा फळभाज्यांच्या बिया व रोपे लावण्यात आली. औषधी वनस्पतींच्या लागवडीवरही यावेळी भर देण्यात आला. या उपक्रमाचे महत्त्व शिक्षिका श्रीमती मानसी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगीता नाईक यांनी या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, “परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाज्या कशा उगवतात हे समजेलच, शिवाय श्रमाची ओढ निर्माण होईल. यातूनच भविष्यात निसर्गप्रेमी पिढी घडण्यास मदत होईल.”
या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे आणि शाळेच्या या हरित उपक्रमाचे कृषी विभागाकडून विशेष कौतुक करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

