( गणपतीपुळे / वैभव पवार )
शिवसेना (शिंदे गट) उपतालुका संघटक अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांनी वाटद, खालगाव आणि कोतवडे या जिल्हा परिषद गटांमध्ये युवकांना एकत्र आणत संघटन बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार तसेच तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या शिफारशीनुसार अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांची उपतालुका संघटकपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी पदाची जबाबदारी स्वीकारत युवकांना पक्षकार्यात सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी संघटन वाढीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मालगुंड गावचे सुपुत्र असलेले अभिषेक उर्फ भैय्या साळवी हे शिवसेनेचे उगवते युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. युवकांच्या समस्या, तसेच गोरगरीब नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी तत्पर राहणे, सामाजिक उपक्रमांवर भर देणे आणि स्थानिक प्रश्न मार्गी लावणे, या दिशेने खालगाव, वाटद व कोतवडे गटांमध्ये ते सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीचा बिगूल वाजल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी व्यापक प्रचार मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात येत असून, या मोहिमेत युवकांची ताकद प्रभावीपणे वापरण्यात येणार आहे. तालुकाप्रमुख बंड्या साळवी आणि उपतालुकाप्रमुख राजू साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून त्यांचा विश्वास सार्थकी लावण्याचा निर्धार अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांनी व्यक्त केला आहे.

