(रत्नागिरी /प्रतिनिधी)
राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रत्नागिरी शाखेत तब्बल ३९ बनावट कर्जप्रकरणे उभी करून सुमारे १ कोटी ९८ लाख ६९ हजार ६७३ रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन शाखाधिकारी संतोष शरद नारकर यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बँकेचे प्रतिनिधी शेखरकुमार उत्तम अहिरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १ एप्रिल २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. या काळात संतोष नारकर हे रत्नागिरी शाखेचे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनी बँकेचा विश्वासघात केला आणि अस्तित्वात नसलेल्या किंवा बनावट कर्जप्रकरणांच्या आधारे मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तयार करण्यात आलेल्या या ३९ बनावट कर्जप्रकरणांतून मंजूर झालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून बँकेची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम, २०२३ मधील कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (४), ३३६ (२) व ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही खातेदारांनी आपल्या नावावर दाखवण्यात आलेली कर्जे आपण घेतलीच नसल्याचे लेखी निवेदन पोलिस अधीक्षकांकडे सादर केले होते. त्यानंतर या संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू झाली आणि अखेर हा बहुचर्चित कर्ज घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रातील अंतर्गत नियंत्रण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

