(गुहागर)
गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र, ज्येष्ठ नागरिक व समाजकार्यकर्ते महादेव देवजी आंबेकर (वय ७०) यांचे रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई (अंधेरी) येथील होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने आंबेकरवाडीत तसेच संपूर्ण उमराठ गावात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उमराठ खुर्द आंबेकरवाडी व उमराठ गावाच्या विकासकामांत, धार्मिक उपक्रमांत आणि सामाजिक जडणघडणीत महादेव आंबेकर हे एक भक्कम आधारस्तंभ होते. शांत, समंजस, मनमिळावू आणि परोपकारी स्वभावामुळे ते सर्वांच्या विश्वासास पात्र ठरले. पारंपरिक चालीरीती, रूढी, परंपरा यांचा सखोल अभ्यास असणारे आणि योग्य न्याय-निवाडा करण्याची विलक्षण क्षमता असलेले ते एक आदर्श मार्गदर्शक होते.
त्यांनी गणपतीच्या कारखान्यात सुबक मूर्ती बनविणे, मूर्ती रंगविणे, आंबा व काजूंची कलमे तयार करणे, तसेच आंबेकरवाडी भजन मंडळात गायकी अशी विविध कलाकौशल्ये जपली होती. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि कष्टशील वृत्ती या त्यांच्या कार्याची ओळख होती.
मुंबईत माध्यमिक शिक्षण पूर्ण करूनही त्यांना कोकणातील लाल मातीत जगण्याची प्रचंड ओढ होती. त्यामुळे ते आपल्या मूळ गावी परत आले आणि वडिलांच्या सहकार्याने छोटेसे चहा-नाश्त्याचे हॉटेल सुरू करून लोकसेवेला प्रारंभ केला. ते तब्बल २५ वर्षे उमराठ गावाचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते तसेच सुमारे १५ वर्षे उमराठ खुर्द आंबेकरवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय नेतृत्व केले.
कोकणातील प्रसिद्ध लोककला नमन क्षेत्रातही त्यांचा मोठा वाटा होता. विविध नाट्यभूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्या — सत्यवान, हरिश्चंद्र, श्रीयाळ, दुष्यंत, ययाती, नल अशा अनेक भूमिका त्यांच्या अभिनयाची साक्ष देत राहतील. कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि कलेची परंपरा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही त्यांची विशेष वृत्ती होती.
त्यांची मेहनत, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसमावेशक वृत्तीमुळे ते आंबेकरवाडीचे खरे अर्थाने आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने वाडीतील एक ज्येष्ठ, आदरणीय व्यक्तिमत्त्व हरपल्याची मोठी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलगे सुरेश व अमोल, सुना, नातवंडे व भाऊबंद असा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबावर आलेल्या या दुःखद प्रसंगात संपूर्ण उमराठ गाव त्यांच्या सोबत आहे. कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, तसेच दिवंगत कै. महादेव देवजी आंबेकर यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ग्रामपंचायत उमराठ व उमराठ खुर्द आंबेकरवाडी प्रतिष्ठानची ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.
उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

