(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गणपतीपुळे तीर्थक्षेत्र दिवाळी सणाच्या नव्या पर्यटन हंगामासाठी सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील सर्वात लहान मोठ्या व्यवसायिकांकडून जय्यत तयारीची लगबग दिसून येत असून सर्वच व्यावसायिक पर्यटकांच्या स्वागतासाठी आतुर झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षांचा कालावधी असल्याने या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या रोडावली होती. त्यामुळे पर्यटन व्यवसाय चांगलाव थंडावला होता. अखेर आता सर्वच लहान मोठे व्यवसायिकांना गजबजलेल्या दिवाळी पर्यटन हंगामाची चाहूल लागली असून पर्यटकांच्या प्रतिक्षेत व्यवसायिक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या नव्या पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे परिसरातील सर्व लहान मोठ्या व्यवसायिकांकडून आपापल्या हॉटेलस लॉजिंग व घरगुती खोल्यांची रंगरंगोटी, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई व इतर सोयी सुविधा पर्यटकांना मिळवून देण्यासाठी पर्यटन व्यवसायिक सज्ज झाले आहेत. तसेच गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर देखील पर्यटकांच्या सेवेसाठी सर्व लहान व्यवसायिक सज्ज झाले असून पर्यटकांचे खास आकर्षण असलेला वॉटर स्पोर्ट व्यवसाय देखील समुद्रावर दाखल झाला आहे. या वॉटर स्पोर्ट मध्ये पर्यटकांना जेसकी बोट, ड्रॅगन, डिस्को बनाना राईट अशा वेगवेगळ्या जलक्रीडांचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील उंट, घोडे सफर पर्यटकांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. त्याच बरोबर एटीव्ही बाईक, फोटोग्राफर व इतर व्यवसायिक सज्ज झाले आहेत.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील शहाळी व्यवसायिक देखील आपापल्या तयारीसाठी मंडप टाकून सज्ज झाले आहेत .एकूणच दिवाळी पर्यटन हंगाम गर्दीने फुलणार असून पर्यटकांच्या स्वागतासाठी सर्वच पर्यटन व्यवसाय सज्ज असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाजगी लॉजिंग व एमटीडीसी मध्ये बुकिंग फुल
दिवाळी सणाच्या पर्यटन हंगामासाठी गणपतीपुळे येथील काही खाजगी लॉजिंग मध्ये व महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या पर्यटन निवासामध्ये दिनांक 31 ऑक्टोबर पर्यंत पर्यटकांनी खोल्यांचे बुकिंग फुल असल्याची माहिती संबंधित व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे इतर सर्वच व्यवसायिकांसाठी देखील पर्यटकांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारचा मिळून मोठ्या प्रमाणात दिवाळी पर्यटन हंगामात मोठी आर्थिक उलाढाल होईल व पर्यटन व्यवसायिकांना चांगला दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

