(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील चिंद्रवली–कोंडवी वाकणजवळ बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मिनी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. मोहनेश चंद्रम बडगेर (वय ३२, रा. कर्नाटक) असे मृत कामगाराचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, धोकादायक वळणावर बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मिनी बस थेट दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील सर्व जखमी हे रस्त्याच्या कामावर कार्यरत असलेले मजूर असून ते सध्या हरचेरी येथे वास्तव्यास होते. बुधवारी दुपारी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी हे सर्व कामगार मिनी बसने पाली येथील बाजारपेठेत गेले होते. खरेदी आटोपून हरचेरीच्या दिशेने परतताना चिंद्रवली–कोंडवी येथील वळणावर हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी चालकाच्या शेजारी बसलेला मोहनेश बडगेर गाडीबाहेर फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बसमधील अन्य दहा प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत बचावकार्य केले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, संबंधित धोकादायक वळणावर सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

