( नागपूर )
नागपुरात एका अमानुष आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वेगळे राहणाऱ्या पत्नीने कायदेशीर मार्गाने मुलीचा ताबा मागू नये, याच भीतीपोटी एका पित्याने आपल्या पोटच्या 8 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरोदेनगर परिसरात राहणाऱ्या शेखर कृष्णराव शेंदरे (वय 46) असे आरोपी पित्याचे नाव आहे. शेखर शेंदरे पत्नी शुभांगी, मुलगी धनश्री (वय 8), आई कुसुमताई आणि लहान भाऊ उमेश यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होता. मात्र शेखर दारूच्या व्यसनाधीन झाला होता. संशयाच्या भोवऱ्यात अडकून तो पत्नी शुभांगीला वारंवार मारहाण करत होता.
या त्रासाला कंटाळून शुभांगी वेगळी राहू लागली होती. मात्र मुलगी धनश्री आपल्यासोबत राहावी, अशी तिची इच्छा होती. शेखरने मात्र धनश्रीचा ताबा स्वतःकडेच ठेवला होता. त्यामुळे शुभांगी लपूनछपून मुलीला भेटत होती. आईकडे जाण्याची ओढ आणि भेटी यामुळे धनश्री ही शेखर आणि शुभांगी यांच्यातील सततच्या वादाचे कारण ठरत होती.
पत्नी कायदेशीर मार्गाने मुलीचा ताबा मिळवू शकते, याची जाणीव शेखरला होती. याच रागातून आणि विकृत मानसिकतेतून त्याने थरकाप उडवणारा निर्णय घेतला. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झोपेत असलेल्या धनश्रीच्या छातीत त्याने चाकूने वार केला. वेदनेने किंकाळ्या फोडणाऱ्या धनश्रीचा आवाज ऐकून घरातील सदस्यांनी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला पाहून सर्वांना मोठा धक्का बसला.
शेखरची आई आणि भाऊ उमेश यांनी धनश्रीला तातडीने वाठोडा पोलीस ठाण्यात नेले आणि तेथून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान धनश्रीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच तिची आई शुभांगी आणि आजीवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या प्रकरणी शेखरच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध हत्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने नागपूरमध्ये खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

