(मुंबई)
भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांनी पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले असून, प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अनंत गर्जे यांच्यासह त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि भाऊ अजय गर्जे यांनाही आरोपी केले आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या शीतल गर्जे-आंधळे आणि अजय गर्जे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिला होता.
डॉ. गौरी पालवे यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. एफआयआरनुसार, पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. तपासासाठी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने अनंत गर्जे यांना न्यायालयीन कोठडीतून तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची परवानगी दिली होती. या कालावधीत तपासात पूर्ण सहकार्य केल्याचा दावा अनंत गर्जे यांनी आपल्या जामीन अर्जात केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे राजकीय आणि सामाजिक पातळीवरही मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले गेले असून, न्यायालयाच्या आगामी सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

