(मुंबई )
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून, प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रात चार दिवसांचा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत राज्यातील संबंधित महानगरपालिका क्षेत्रात कुठेही दारू विक्री होणार नाही.
राज्य निवडणूक आयोग आणि महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली 29 महानगरपालिकांच्या हद्दीत 13 जानेवारी ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत ड्राय डे लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार दारू विक्री करणारी सर्व दुकाने, बार आणि परमिट रूम चार दिवस पूर्णपणे बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुका शांततेत, पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ड्राय डेचा प्रभाव मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये राहणार आहे. निवडणूक आयोग आणि महसूल विभाग संयुक्तपणे या नियमाची कठोर अंमलबजावणी करणार असून, दुकानदार आणि संबंधित व्यावसायिकांना याबाबत आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे.
ड्राय डे अंमलबजावणीचे वेळापत्रक:
* मंगळवार, 13 जानेवारी 2026: सायंकाळी 6 वाजल्यापासून दारू विक्रीवर बंदी
* बुधवार, 14 जानेवारी 2026: पूर्ण दिवस ड्राय डे
* गुरुवार, 15 जानेवारी 2026: मतदानाचा पूर्ण दिवस
* शुक्रवार, 16 जानेवारी 2026: मतमोजणी पूर्ण होईपर्यंत दारू विक्री बंद
या कालावधीत ड्राय डेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

