(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर परिसरात शनिवारी माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अवघ्या एका दिवसाचे नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. हे अर्भक मुलगा असून, त्याला अशा निर्दयीपणे सोडून देणाऱ्या घटनेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवारी) सकाळी क्रांतीनगर परिसरातून जाणाऱ्या काही नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, एका निर्जन ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ कापडात गुंडाळलेले नवजात बाळ आढळून आले. तातडीने नागरिकांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी माणुसकी दाखवत या नवजात बालकाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अर्भकाची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. हे अर्भक कोणाचे आहे आणि त्याला कशा परिस्थितीत सोडण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोषींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, तसेच स्थानिक रुग्णालयांतील अलीकडील प्रसूतीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित निर्दयी पालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे

