(मुंबई)
महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपली प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. या प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची स्थावर व जंगम मालमत्ता समोर आली असून, माजी महापौर आणि माजी नगरसेवकांच्या संपत्तीत झालेली झपाट्याने वाढ मतदारांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्रचाराचा जोर वाढत असतानाच महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण, याकडे लक्ष वेधले गेले आहे.
महिला उमेदवाराने मोडला मुंबई-पुण्याचा रेकॉर्ड
मुंबई आणि पुण्यातील गडगंड श्रीमंत उमेदवारांचा रेकॉर्ड ठाण्यातील महिला उमेदवाराने मोडला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या परिषा सरनाईक या महाराष्ट्रातील सर्वाधिक संपत्ती असलेल्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती तब्बल 381 कोटी 88 लाख रुपये इतकी आहे. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःची एकूण संपत्ती 271 कोटी 18 लाख 39 हजार 647 रुपये असल्याचे जाहीर केले होते.
परिषा सरनाईक या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी आहेत. याआधी त्यांची संपत्ती 38 कोटी 73 लाख रुपये होती. मात्र आता त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतील उमेदवारांचा श्रीमंतीचा रेकॉर्ड त्यांनी मोडला आहे.
मुंबईतील उमेदवारांची संपत्ती
मुंबईत शिवसेना (शिंदे गट) उमेदवार समाधान सरवणकर यांची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता 46 कोटी 59 लाख रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. 2017 मध्ये ही संपत्ती 9 कोटी 43 लाख रुपये होती. तर शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार श्रद्धा जाधव यांची मालमत्ता 2024 मध्ये 44 कोटी रुपये होती, जी आता 46 कोटींवर पोहोचली असून एका वर्षात साडेतीन कोटींची वाढ झाल्याचे दिसून येते.
ठाणे महापालिकेत 114 कोट्यधीश उमेदवार
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 649 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार त्यापैकी तब्बल 114 उमेदवार कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून उत्पन्न आणि संपत्तीतील मोठी तफावत समोर आली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे काही उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मुंब्रा येथील शरद पवार गटाचे उमेदवार मोहम्मद जैद अतिक खांचे यांनी प्रतिज्ञापत्रात वार्षिक उत्पन्न केवळ 20 हजार 502 रुपये असल्याचे नमूद केले असून, ते ठाणे महापालिका निवडणुकीतील सर्वात कमी उत्पन्नाचे उमेदवार ठरले आहेत.
दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी 126 कोटी 66 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. कळवा येथील तरुण उमेदवार मंदार कोणी यांच्या नावावरही तब्बल 105 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
शिंदे गटातील कोट्यधीश उमेदवार
शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या अनेक उमेदवारांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. त्यामध्ये उषा भोईर (29.53 कोटी), सपना भोईर (14.68 कोटी), देवराम भोईर (15.17 कोटी), संजय भोईर (29.53 कोटी), सिद्धार्थ पांडे (9.49 कोटी), सुलेखा चव्हाण (17.95 कोटी), कल्पना पाटील (32.61 कोटी), हणमंत जगदाळे (63.44 कोटी), अशोक वैती (35.56 कोटी), दर्शना व योगेश जानकर (15.85 कोटी), शिल्पा वाघ (16.79 कोटी), मनोज शिंदे (29.94 कोटी), एकता भोईर (15.85 कोटी), जयश्री फाटक (65.25 कोटी), नम्रता पमनानी (15.51 कोटी), अनिता गौरी (15.66 कोटी), मनाली पाटील (61.68 कोटी), मिलिंद पाटील (50.62 कोटी), महेश साळवी (12.98 कोटी) आणि शैलेश पाटील (22.39 कोटी) यांचा समावेश आहे.
भाजप, उद्धव सेना, राष्ट्रवादी आणि मनसेतील कोट्यधीश
भाजपकडून स्नेहा आंब्रे (16.20 कोटी), अमित सरय्या (26.22 कोटी), भरत चव्हाण (16.67 कोटी), प्रतिभा मढवी (43.57 कोटी), नंदा व कृष्णा पाटील (51.20 कोटी) हे कोट्यधीश उमेदवार आहेत.
उद्धव ठाकरे गटाकडून महेश्वरी तरे (23.44 कोटी), नंदिनी विचारे (41.87 कोटी), रोहिदास मुंडे (16.22 कोटी) तर अजित पवार गटाचे नजीब मुल्ला (9.53 कोटी) आणि शरद पवार गटाचे हिरा पाटील (21.09 कोटी) यांनीही कोट्यवधींची मालमत्ता जाहीर केली आहे. मनसेच्या रेश्मा पवार यांनी 17.78 कोटी रुपयांची संपत्ती दाखवली आहे.
अपक्ष उमेदवारही कोट्यधीश
अपक्ष उमेदवारांमध्येही कोट्यधीशांची संख्या लक्षणीय आहे. प्रमिला केणी (61.68 कोटी), कविता पाटील (55.82 कोटी), विकास दाबाडे (22.08 कोटी), लॉरेन्स डिसोझा (16.27 कोटी) आणि भूषण भोईर (14.68 कोटी) यांनी प्रतिज्ञापत्रात मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे नमूद केले आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत लोकप्रतिनिधित्वाचा दावा केला जात असताना, उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली संपत्तीतील प्रचंड तफावत नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या संपत्तीतील वाढ, कोट्यधीशांची संख्या आणि आर्थिक पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

