(रत्नागिरी)
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक आणि अनुभवाधिष्ठित दर्शन घडवणारे ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६ दिनांक १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मांडकी पालवण, ता. चिपळूण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था या संकुलात आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महाराष्ट्राला शेती व ग्रामीण संस्कृतीची दीर्घ आणि समृद्ध परंपरा लाभली आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काळातील ग्रामीण कादंबरी, कविता, कथा, नाटक, पोवाडे, ओव्या, कोळीगीते आणि शेतकरीगीतांपर्यंत मराठी साहित्य अधिक समृद्ध झाले आहे. ग्रामीण जीवनातील प्रश्न, संघर्ष, आनंद आणि वास्तव साहित्याच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य या साहित्यप्रवाहाने केले आहे.
कृषी हा केवळ ग्रामीण जीवनाचा आधार नसून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन, शेतीपूरक उद्योग आणि शाश्वत शेती यांवर आधारित साहित्य शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. तरीही शेतीसमोरील समस्या आणि आव्हाने कायम असून त्यावर सखोल चर्चा होणे गरजेचे आहे, या उद्देशाने हे संमेलन आयोजित केले जात आहे.
सहकार हा कृषीचा अविभाज्य घटक आहे. सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दुग्ध संघ आणि विविध सहकारी संस्थांमुळे ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळाली आहे. सहकार चळवळीतील मूल्ये, व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकीवर आधारित साहित्य समाजासाठी मार्गदर्शक ठरत आले आहे. ग्रामीण, कृषी आणि सहकार या तिन्ही विषयांना एकत्रितपणे व्यासपीठ देणारे हे संमेलन राज्यात प्रथमच होत असून, ही संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
या संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांची एकमताने संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय जी. भावे यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारले आहे, तर डॉ. निखिल चोरगे प्रमुख कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
संमेलनात महाराष्ट्रासह राज्याबाहेरील नामवंत लेखक, साहित्यिक, संशोधक, प्रगतशील शेतकरी, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि कृषी तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. हजारो शेतकरी व साहित्यप्रेमी उपस्थित राहणार असून पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्रे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या उद्घाटनासाठी खा. शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. समारोपप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
ग्रामीण, कृषी आणि सहकार या तिन्ही क्षेत्रांचा साहित्याच्या माध्यमातून समन्वय साधणारे हे संमेलन मराठी साहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि समाजमनावर दीर्घकालीन प्रभाव टाकेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

