भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि ‘फिनिशर’ म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंग लवकरच आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. रिंकू सिंग आणि मछली शहरच्या समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्या विवाहाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. रिंकूच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या तारखेबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
केव्हा होणार रिंकू सिंगचे लग्न?
याआधी रिंकू आणि प्रिया यांचे लग्न नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होईल, अशी चर्चा होती. मात्र संसदेचे अधिवेशन आणि रिंकूचे व्यस्त क्रिकेट वेळापत्रक यामुळे तारीख निश्चित होत नव्हती. आता कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे की, टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतरच हा विवाहसोहळा पार पडेल. टी-20 वर्ल्ड कप फेब्रुवारीमध्ये सुरू होऊन मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपणार असल्याने एप्रिल 2026 मध्ये रिंकू आणि प्रिया विवाहबंधनात अडकणार आहेत.
भावाचा खुलासा आणि ‘जर्सी नंबर 35’चे खास कनेक्शन
रिंकूचा मोठा भाऊ सोनू लेफ्टी याने या विवाहवृत्ताला दुजोरा दिला आहे. यासोबतच त्याने रिंकूच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली. रिंकूच्या मूळ गावी अलीगड येथे एक नवी क्रिकेट अकादमी सुरू करण्यात येणार असून, तिला भारतीय संघातील रिंकूच्या जर्सी क्रमांकावरून ‘अकॅडमी 35’ असे नाव देण्यात येणार आहे.
अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत साखरपुडा
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा 8 जून 2025 रोजी लखनऊमधील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडला होता. या सोहळ्याला राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांनी उपस्थित राहून जोडप्याला आशीर्वाद दिले होते. या हाय-प्रोफाइल कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
क्रिकेट आणि राजकारण या दोन क्षेत्रांना जोडणाऱ्या या विवाहामुळे चाहत्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

