देवी-देवतांची मंदिरे आपण अनेक ठिकाणी पाहिली आहेत. मात्र मृत्यूची देवता मानल्या जाणाऱ्या यमराजाचेही मंदिर आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. मृत्यू ही संकल्पनाच माणसाला भीतीची वाटते. त्यामुळे यमराजाशी संबंधित श्रद्धा, कथा आणि मंदिरे यांच्याबाबत लोकांच्या मनात कुतूहलासोबत भीतीही असते.
मृत्यू अटळ आहे, हे मान्य करूनही तो सहज स्वीकारणं सोपं नसतं. म्हणूनच मृत्यू शांत आणि चांगला यावा यासाठी प्रार्थना केली जाते. पण यमराजाच्या नावानेच लोक घाबरतात. यामुळेच भारतातील हे अनोखे यमराज मंदिर इतर मंदिरांसारखे गर्दीने गजबजलेले दिसत नाही.
भारतामध्ये अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले आणि देवतांशी संबंधित रहस्यमय कथा प्रचलित आहेत. त्यापैकीच एक आहे मृत्यू देवता यमराजाचे मंदिर. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर येथे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या मंदिरात दर्शनासाठी फारसे कोणी जात नाही. श्रद्धेने नमस्कार करणारे लोकही मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतात.
भरमौरमधील यमराज मंदिराचे रहस्य
हे मंदिर आकाराने लहान असून एखाद्या साध्या घरासारखे दिसते. मंदिरात एक रिकामी खोली आहे, जिथे यमराज वास करतात, अशी मान्यता आहे. या खोलीला ‘यमराज दरबार’ म्हणतात. याशिवाय आणखी एक खोली आहे, जी भगवान चित्रगुप्ताची असल्याचे मानले जाते.
पौराणिक कथांनुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर यमदूत त्या आत्म्याला सर्वप्रथम याच ठिकाणी घेऊन येतात. चित्रगुप्त त्या व्यक्तीच्या पाप-पुण्यांचा लेखाजोखा मांडतात. त्यानंतर आत्म्याला स्वर्गात जायचे की नरकात, याचा अंतिम निर्णय यमराज घेतात. यमराजाच्या निर्णयानुसार आत्म्याला पुढील प्रवासासाठी नेले जाते, अशी श्रद्धा आहे.
मंदिरातील चार अदृश्य दरवाजे
गरुड पुराणात यमराजाच्या दरबाराला चार दरवाजे असल्याचे वर्णन आहे. त्याच आधारावर या मंदिरातही चार अदृश्य दरवाजे असल्याचे मानले जाते. हे दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या धातूंनी बनलेले असल्याची आख्यायिका आहे. या मंदिराला धर्मेश्वर महावेद मंदिर, धरमराज मंदिर आणि यमराज मंदिर अशा नावांनीही ओळखले जाते.
हिमाचल प्रदेशात अनेक प्रसिद्ध मंदिरे असली तरी हे मंदिर वेगळे ठरते. येथे कोणीही आत जाऊन पूजा करत नाही. श्रद्धाळू बाहेरूनच हात जोडून नमस्कार करतात.
इतिहास आणि बांधकाम
हे मंदिर नेमके कोणी आणि कधी बांधले, याची ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र सहाव्या शतकात चंबाच्या राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आढळतात. उंच पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले हे मंदिर आजही रहस्यमय मानले जाते.
यमराज मंदिराशी जोडलेल्या श्रद्धा
स्थानिक मान्यतेनुसार, मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम याच मंदिरात येतो. येथे चित्रगुप्त आत्म्याच्या कर्मांचा हिशेब तपासतात आणि यमराज अंतिम निर्णय घेतात. मृत्यूच्या भीतीमुळे अनेक लोक या मंदिरापासून दूर राहतात. मंदिराचे दर्शन घेतल्यानंतरही लोक आत न जाता बाहेरूनच यमराजांना नमस्कार करतात.
हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून मृत्यू, कर्म आणि जीवनाच्या अंतिम सत्याबाबत विचार करायला लावणारे एक अनोखे स्थान मानले जाते.

