(देवळे / प्रकाश चाळके)
दापोली तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक मंडळीच्या अंतर्गत कार्यरत मराठा मंदिर CBSE इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली या शाळेने शिक्षण क्षेत्रात मानाचा टप्पा गाठला आहे. नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात या शाळेला “राज्यस्तरीय उत्कृष्ट शाळा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या गौरवामुळे दापोलीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राचा अभिमान द्विगुणित झाला आहे.
राष्ट्रीय स्तरावर झालेल्या “रंगोत्सव सेलिब्रेशन 2025” या स्पर्धेत शाळेच्या १०२ विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांची निवड आता येत्या ११ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
आणखी अभिमानास्पद बाब म्हणजे, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे महाराष्ट्र केंद्र दापोलीच राहणार असून, त्याचे आयोजन मराठा मंदिर CBSE इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली येथे होणार आहे. ही घटना शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, असा विश्वास शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापकांचेही मोठे योगदान आहे. त्यांचे भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी रत्नागिरी जिल्ह्यातून नामांकन झाले होते. तसेच, त्यांनी नुकताच महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केला आहे, ही बाब संस्थेसाठी व तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
या सर्व यशाचे श्रेय शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांना जाते. संस्थेचे अध्यक्ष दळवी सर तसेच सर्व विश्वस्त आणि कार्यकारी मंडळ यांनी या यशस्वी प्रवासात मोलाची भूमिका बजावली. संस्थेच्या वतीने सर्व सहभागींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

