(दापोली / रत्नागिरी)
साखरपुड्याच्या पूर्वसंध्येला घरात आनंदाचे वातावरण… मेहंदीची रंगत… नवरदेव-वधूची लगबग… मात्र या उत्सवातच लक्षचुकीचा फायदा घेत वधूच्या सोन्याच्या पाटल्या चोरीला गेल्याची धक्कादायक घटना दापोलीतील शिवाजीनगर भागात ७ डिसेंबर रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहंदी काढण्यापूर्वी वधूच्या हातातील सहा तोळे सोन्याच्या दोन पाटल्या, अंदाजे सहा लाख रुपये किंमतीच्या, काढून घरातील टेबलाच्या खणात सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची धावपळ, पाहुण्यांची वर्दळ आणि घरातील गडबडीत या पाटल्या नजरेआड झाल्या. रात्री उशिरा खण उघडून पाहिल्यावर त्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर घरच्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वधूच्या कुटुंबीयांनी ९ डिसेंबर रोजी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

