(रत्नागिरी)
रत्नागिरीजवळील मजगाव गावामधील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून विविध वीज समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे अभियंते नागवेकर यांनी मजगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.
ग्रामस्थांनी वीजबिलांशी संबंधित अडचणी, जुने व धोकादायक वीज पोल बदलण्याची आवश्यकता, नवीन डी.पी. (Distribution Point) बसवण्याची मागणी, तसेच इतर तांत्रिक अडचणी मांडल्या. यावर अभियंते नागवेकर यांनी सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस मजगाव ग्रामपंचायत सरपंच फैयाज मुकादम, उपसरपंच शरीफ इब्जी, ग्रामपंचायत सदस्य हुसैन टेमकर, इतर सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, जिक्रिया मुजावर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधत त्यांच्या शंका, अडचणी समजून घेतल्या. या सकारात्मक संवादामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यात देखील महावितरणकडून असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.