(उज्जैन /नाशिक प्रतिनिधी)
ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान असलेले भगवान श्री महाकाल हे काळाचे काळ आहेत. त्यांच्या चरणी आज लाखो सेवेकर्यांनी समर्पित केलेल्या भस्म लिंगार्चन सेवेमुळे आगामी काळात निश्चितच विश्वशांती नांदेल आणि समस्त मानव जातीचे कल्याण होईल, असे विचार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी मांडले तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्यांनी जय महाकाल चा एकच जयघोष करीत संपूर्ण कार्यक्रम स्थळ दणाणून सोडले.
काळावर अधिराज्य करणारे, अकाल मृत्यू व भय निवारण करणारे दक्षिणाभिमुख एकमेव ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वरांची उज्जैन नगरी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आगमनाने आणि स्वामी सेवेकऱ्यांच्या प्रचंड उत्साहाने आणि सेवाभावाने ओसंडून वाहत होती. हिंदू धर्मपरंपरेत अवंतिका (उज्जैन) नगरीला मोक्षपुरी, ज्योतिर्लिंग क्षेत्र व महाकुंभ पर्वस्थळ म्हणून विशेष महत्त्व आहे. हा भस्मलिंगार्चन सोहळा सर्वांसाठी अत्यंत पुण्यदायी आहे. सामूहिक उपासनेद्वारे सेवेकऱ्यांना आध्यात्मिक शांती, सकारात्मक ऊर्जा व जीवनातील अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य या सेवेतून साध्य होईल असे आशीर्वाद गुरुमाऊलींनी दिले.
श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवामार्गातर्फे श्री क्षेत्र उज्जैन येथे ऐतिहासिक अतिउच्च भस्म लिंगार्चन सोहळा अभूतपूर्व प्रतिसादात आणि अपूर्व उत्साहात अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. विश्वशांती व मानव कल्याणासाठी समस्त सेवेकऱ्यांच्या सामूहिक आध्यात्मिक संकल्पाने भस्म लिंगार्चन सोहळ्याची सुरुवात झाली. सेवेकऱ्यांनी अतिशय श्रद्धेने-निष्ठेने आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही अतिउच्च सेवा भगवान श्री महाकालाच्या चरणी रुजू केल्यानंतर गुरुमाऊली श्री. मोरे यांचे अमृततुल्य प्रासादिक हितगुज झाले. यावेळी गुरुमाता सौ मंदाताई मोरे,गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्यासह खांडवा येथील खासदार ज्ञानेश्वर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, मध्यप्रदेश मधील भाजपाचे सचिव भवरसिंह चौधरी, मंत्रालयातील सचिव माणिकराव गुरसळ, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, राहुल चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गुरुमाऊली श्री मोरे यांनी ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान असलेले प्रभू श्री महाकाल यांच्या भस्म लिंगार्चन सोहळ्याचे महत्त्व स्पष्ट केले. आजच्या अतिउच्च सेवेमध्ये सहभागी झालेले सारे सेवेकरी भाग्यवान आणि पुण्यवान आहेत. समस्त मानवजातीच्या सर्वांगीण कल्याणासाठी, येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी व विश्वशांती प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ही सेवा राष्ट्र, समाज आणि धर्महिता बरोबरच अखिल जीवसृष्टीचे कल्याण व्हावे आणि अखिल विश्वात विश्वशांती नांदावी त्याचप्रमाणे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित संकटांपासून जीवसृष्टीचे रक्षण व्हावे तसेच राष्ट्राचे संरक्षण व्हावे अशा उदात्त भावनेतून ही सेवा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये संपूर्ण देशभरातून तसेच विदेशातून सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या सेवेतून प्राप्त झालेली ऊर्जा समाज कल्याणासाठी वापरा, ग्राम-नागरी अभियानासाठी वापरा आणि स्वामी कार्यासाठी वापरा आणि त्या योगे अखिल जगत स्वामिमय करावे अशी आज्ञा गुरुमाऊली श्री. मोरे यांनी केली.
आपल्या हितगुजात त्यांनी ग्राम अभियानातील १८ विभागांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. येणारा काळ कठीण असला तरी ग्राम-नागरी अभियानाच्या माध्यमातून घराघरात स्वामी कार्य पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले. गर्भसंस्कार, शिशु, बाल संस्कार, युवा प्रबोधन, विवाह संस्कार, कृषी,आयुर्वेद या विभागांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.
उज्जैन च्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक भस्म लिंगार्चन सोहळा
भगवान श्री महाकाल हे उज्जैन येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थापित आहेत. ही नगरी सप्त मोक्ष पुऱ्यांपैकी एक आहे. या नगरीत आदिशक्ती भगवतीचे शक्तीपीठ आहे.शिवाय महाकुंभ पर्वामुळे ही अवंतिका अर्थात उज्जैन नगरी अनादि कालापासून पुनित झाली आहे. अशा पवित्र नगरीमध्ये प्रथमच भस्म लिंगार्चन सारखा अतिउच्च सोहळा होत असल्यामुळे तो ऐतिहासिक ठरला आहे.
नीटनेटके नियोजन, एकाच वेळी लाखो सेवेकर्यांनी बसून केलेली सामूहिक सेवा, देश-विदेशातून आलेल्या सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह, उज्जैन मधील साधू संतांचा आशीर्वाद यामुळे सेवामार्गाचा हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळावेगळा न भूतो न भविष्यती असा संस्मरणीय ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेकडो स्वयंस्फूर्त सेवेकर्यांनी योगदान दिले. यावेळी गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे उभयतांच्या हस्ते प्रधान मंडल पूजन पार पडले.
मंगळ पूजन विधीला उस्फूर्त प्रतिसाद
वैयक्तिक प्रगतीसाठी उज्जैन येथे कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मंगळ पूजनाची विशेष पूजा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने सेवेकरी यात सहभागी झाले होते. वेद विज्ञान संशोधन विभागाचे प्रतिनिधी दीपक शास्त्री मुळे व त्यांची संपूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली पौरोहित्य झाले.

