(सावंतवाडी)
सावंतवाडी येथे शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून शंभर ते दीडशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला सागर सुबोध कारिवडेकर याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी तो आपल्या कारिवडे येथील सासरवाडीत आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
सागर कारिवडेकर हा गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. सावंतवाडी पोलीस ठाणे येथे त्याच्याविरोधात पुण्यातील गुंतवणूकदारांवर गाडी घालून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय ठाणे येथेही फसवणुकीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
सहा महिन्यांपूर्वी सावंतवाडीतील सर्वोदयनगर परिसरात परताव्याची मागणी करण्यासाठी आलेल्या पुण्यातील गुंतवणूकदारांवर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी कारिवडेकरसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. इतर आरोपींना अटक झाली असली तरी कारिवडेकर फरार होता. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी ठाणे येथे तक्रारी दाखल केल्या असून ठाणे आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. कारिवडेकरने अनेक गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारिवडेकरची सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथील मालमत्ता जप्त केली आहे. त्याचबरोबर त्याची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत.
नाट्यमय अटक कशी झाली?
कारिवडेकर आपल्या सासरवाडीत येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारिवडे येथे सापळा रचला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि पथकाने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. सध्या आरोपीला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुण्यातील गुंतवणूकदारांवर हल्ला आणि फसवणूक प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.
या प्रकरणामुळे शेअर मार्केटमधील फसवणुकीबाबत पुन्हा एकदा गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून, मोठ्या परताव्याच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

